नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात पुन्हा समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी 21 जुलै रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. याआधीही सोनिया गांधींना ईडीने समन्स बजावले होते. मात्र, तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी मुदत मागितली होती.
दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधींचे पुत्र आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची जवळपास 50 तास चौकशी करण्यात आली होती. असोसिएट जर्नल लिमिटेडचा (AJL) ताबा घेण्यासाठी सोनिया गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यंग इंडियन नावाची कंपनी स्थापन केली आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून या कंपनीसाठी कर्ज घेण्यात आले, असा आरोप आहे.
याचबरोबर, काँग्रेसने असोसिएट जनरल लिमिटेडला 90 कोटी रुपयांचे कथित कर्ज दिल्याचा आरोप आहे. हे कर्ज काँग्रेसने यंग इंडियनला दिले आणि याच आधारावर असोसिएट जर्नल लिमिटेडचे बहुतांश शेअर्स सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे गेले होते. 90 कोटींच्या कर्जाच्या बदल्यात यंग इंडियनने काँग्रेसला केवळ 50 लाख रुपये दिल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) तपास सुरू आहे.
राहुल गांधींची सुद्धा चौकशीगेल्या काही दिवसांपूर्वी ईडीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधींची चार दिवस चौकशी केली होती. यावेळी प्रियांका गांधीही राहुल यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयात गेल्या होत्या. ईडीकडून राहुल गांधी यांची सलग होत असलेल्या चौकशीला काँग्रेसने विरोध दर्शवला होता. राहुल गांधी यांना अशा प्रकारे त्रास देता येणार नाही, असे त्यावेळी काँग्रेसने म्हटले आहे.