Dhiraj Sahu : 350 कोटी सापडलेल्या धनकुबेर धीरज साहूंना ईडीचं समन्स; हेमंत सोरेन यांच्याशी कनेक्शन?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 04:55 PM2024-02-08T16:55:03+5:302024-02-08T17:05:08+5:30
Dhiraj Sahu : काँग्रेसचे नेते धीरज प्रसाद साहू यांना ईडीने गुरुवारी समन्स पाठवलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने साहू यांना शनिवारी चौकशीसाठी बोलावलं आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसचे नेते धीरज प्रसाद साहू यांना ईडीने गुरुवारी समन्स पाठवलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने साहू यांना शनिवारी चौकशीसाठी बोलावलं आहे.
या प्रकरणी ईडीने यापूर्वी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली होती. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, ईडी साहू यांची हेमंत सोरेन आणि बीएमडब्ल्यू एसयूव्हीशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी करू इच्छित आहे. ईडीने ही कार सोरेन यांच्या दिल्लीतील घरातून जप्त केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने बुधवारी गुरुग्रामच्या करदारपूर गावात ज्याच्या पत्त्यावर हरियाणा नंबर प्लेट असलेली स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) रजिस्टर होती तिथे छापा टाकला. याच प्रकरणी बुधवारी कोलकात्यात दोन ठिकाणी तपास करण्यात आला. ईडीला संशय आहे की, हे वाहन साहूंशी संबंधित आहे.
धीरज प्रसाद साहू यांच्याकडे 350 कोटींचं घबाड सापडल्यानंतर ते चर्चेत आले होते. आयकर विभागाने साहूंवर कारवाई केली. ओडिशाच्या बोलंगीर जिल्ह्यातील देशी दारू उत्पादन युनिटशी संबंधित परिसरात शोध मोहिमेदरम्यान 350 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेहिशेबी रोकड आणि सुमारे तीन किलोग्राम सोने जप्त केले होतं.
ईडीने अटक केल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या हेमंत सोरेन यांच्या कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पीएमएलए कोर्टाने सोरेन यांना ही कोठडी सुनावली. हेमंत सोरेन न्यायालयात हजेरीसाठी पोहोचले असता, न्यायालयाच्या आवारात उपस्थित असलेल्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. जेल का ताला टूटेगा, हेमंत सोरेन छूटेगा, अशा घोषणा दिल्या.