दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यावरून ईडीने दाखल केलेल्या तक्रारप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज राऊज ॲव्हेन्यूच्या कोर्टात हजर व्हावे लागले आहे. केजरीवाल यांना 15,000 रुपयांच्या जामीन जातमुचलक्यावर आणि 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे.
केजरीवाल ईडीच्या समन्सना हजर राहत नसल्याने ईडीने मॅजिस्ट्रेट कोर्टात त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. यावर कोर्टाने काल केजरीवाल यांची याचिका फेटाळली होती. तसेच शनिवारी राउज़ एवेन्यू कोर्ट(अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे) हजर राहण्याचे आदेश दिले होते. यानुसार आज केजरीवाल कोर्टासमोर हजर झाले. यावेळी केजरीवाल यांच्या बाजूने दोन वकील रमेश गुप्ता आणि राजीव मोहन उपस्थित होते.
न्यायालयाच्या आवारातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. तसेच न्यायालयाभोवतीचे अनेक मार्ग दुसऱ्या बाजुने वळविले होते. न्यायालयातही मोठी सुरक्षा व्यवस्था आणि वकिलांची फौज पहायला मिळाली. त्यांच्या गराड्यातच केजरीवाल कोर्टात गेले.
ईडीने केलेल्या याचिकेवर न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी दिव्या मल्होत्रा यांनी त्यांना १६ मार्च रोजी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. या नोटीसला केजरीवाल यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. मद्य धोरण घोटाळ्यासंबंधात ईडीने आठ वेळा समन्स बजावूनही केजरीवाल यांनी चौकशीला सामोरे जाण्याचे टाळल्यामुळे ईडीने न्यायालयात याचिका दाखल केली होती.