Fiitjee ED News: सक्तवसुली संचालनालयाने fiitjee च्या कोचिंग संस्थेच्या प्रकरणात आज मोठी कारवाई केली. ईडीने fiitjee आणि संस्थेचे मालक डीके गोयल यांच्याशी संबंधित दिल्ली, नोएडा, गुरुग्रामसह इतर ठिकाणच्या १० मालमत्तांवर छापे टाकले. fiitjee ने त्यांचे अनेक कोचिंग सेंटर अचानक बंद केल्यानंतर पहिल्यांदाच छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
fiitjee ने देशभरातील अनेक केंद्र बंद केले आहेत. यामुळे १२००० विद्यार्थांची फसवणूक झाली आहे. विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या शुल्कामुळे fiitjee च्या मालकांचा १२ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.
बँक खात्यात ११ कोटी ११ लाख
यापूर्वी नोएडा पोलिसांनी fiitjee शी संबंधित सर्व बँक खाती गोठवली आहे. फेब्रुवारीमध्ये ही कारवाई करण्यात आली. गोयल यांच्याशी संबंधित खात्यामधील ११ कोटी ११ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
fiitjee ने अनेक कोचिंग सेंटर बंद केल्यानंतर नोएडा पोलिसांनी कारवाई केली होती. fiitjee संस्थेचे मालक डीके गोयल आणि संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाचा >> धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
fiitjee चे मालक दिनेश गोयल आणि इतर ८ संचालकांविरोधात गुन्हेगारी कट, फसवणूक आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणात आता ईडीने तपास सुरू केला आहे.
हजारो विद्यार्थी भरले आहेत पैसे
fiitjee चे देशभरात कोचिंग सेंटर्स आहेत. इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी ही संस्था प्रसिद्ध आहे. पण, संस्थेने अचानक अनेक कोचिंग सेंटर बंद केले. अशीही माहिती समोर आली आहे की, गेल्या काही महिन्यांपासून काही कर्मचाऱ्यांचे वेतनही देण्यात आलेले नाही.
काही माध्यमांनी दिलेल्या रिपोटनुसार, fiitjee मध्ये प्रवेश घेण्यासाठी १२००० हून अधिक विद्यार्थ्यांनी आगाऊ रक्कम भरली होती. पण, कोचिंग सेंटर बंद करण्यात आले. त्यामुळे आता पालक आणि विद्यार्थी fiitjee विरोधात आंदोलन करत आहेत. अनेक ठिकाणी संस्थेविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. संस्थेची ३०० बँक खाती गोठवण्यात आली आहेत.