ईडीची सोनिया आणि राहुल गांधींविरोधात मोठी कारवाई; मनी लाँड्रिंगच्या आरोपपत्रात दोघांचेही नाव, लवकरच सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 18:43 IST2025-04-15T18:22:17+5:302025-04-15T18:43:24+5:30
२५ एप्रिलला ईडीच्या चार्जशीटवर राऊस अव्हेन्यू कोर्टात सुनावणी होणार

ईडीची सोनिया आणि राहुल गांधींविरोधात मोठी कारवाई; मनी लाँड्रिंगच्या आरोपपत्रात दोघांचेही नाव, लवकरच सुनावणी
National Herald Case: नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात सॅम पित्रोदा यांचेही नाव आहे. ईडीने राऊस अव्हेन्यू कोर्टात हे आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील आरोपांची दखल घेण्यासाठी न्यायालयाने २५ एप्रिल ही सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे आता सोनिया आणि राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
ईडीने मंगळवारी नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या चौकशीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांची नावेही आरोपी म्हणून नोंदवण्यात आली आहेत. ९ एप्रिल रोजी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या आरोप पत्राची दखल विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी घेतली आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी न्यायालयाने २५ एप्रिल २०२५ ही तारीख निश्चित केली आहे.
या प्रकरणात गांधी कुटुंबाने यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेमध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे. यंग इंडियनमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा ३८-३८ टक्के हिस्सा आहे. एजेएल ही कंपनी नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र प्रकाशित करत होती. ईडीने आतापर्यंत एजेएल आणि यंग इंडिया यांच्या सुमारे ७५१.९ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. कोट्यवधी रुपयांची ही मालमत्ता गुन्ह्यातून मिळालेल्या पैशातून खरेदी केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, या प्रकरणात ईडीने दोन दिवसांपूर्वी ६६१ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. दिल्ली, मुंबई आणि लखनऊ येथील या मालमत्तांचा ताबा घेण्यासाठी संबंधित रजिस्ट्रारना नोटिसा बजावण्यात आल्या. दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावरील हेराल्ड हाऊसवरही कारवाई सुरु करण्यात आली. मुंबईतील वांद्रे पूर्व भागात असलेल्या हेराल्ड हाऊसच्या सातव्या ते नवव्या मजल्यापर्यंत जिंदाल साउथ वेस्ट प्रोजेक्ट्स लिमिटेडकडून भाड्याने चालवल्या जाणाऱ्या कार्यालयालाही ईडीला नोटीस बजावली आहे.