नवी दिल्ली - अर्जुन खोतकर यांच्या प्रामाणिकपणाला मी दाद देतो. खोतकर आणि त्यांच्या कुटुंबियांवर दडपण आहे. या संकटाच्या काळात कोणताही माणूस सुटकेचा मार्ग शोधतो. त्यांच्यावर कुणाचा दबाव आणि तणाव आहे हे त्यांनी स्पष्ट केले आहे. खोतकरांनी हिंदुत्वाला बदनाम केले नाही. उद्धव ठाकरे, शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर टीका केली नाही असं सांगत अर्जुन खोतकर यांच्या भूमिकेला संजय राऊतांनी समर्थन दिले.
ईडीच्या कारवाईबाबत संजय राऊत म्हणाले की, माझ्यासारख्या अनेकांना ईडीला अटक करायची असेल. संजय राऊत शिवसेनेच्या भूमिकेला देशभरात नेत आहेत. राऊत बाहेर राहिले तर सरकारला अडचणीचे ठरेल. निवडणुकीत भाजपाला जड जाईल. यासाठी माझ्यावर कारवाई होणार असेल तर मी स्वीकारायला तयार आहे. मी गुडघे टेकणार नाही. मी कायदेशीर प्रक्रियेला विरोध केला नाही. मी संसदेत आहे त्यामुळे चौकशीसाठी वेळ मागून घेतला आहे. मी कुठल्याही कारवाईला सामोरे जायला तयार आहे. मला अटक करून शिवसेनेला बळ मिळणार असेल तर मी जेलमध्ये जायलाही तयार आहे. माझ्याआधीही अनेक शिवसैनिकांनी स्वत:चं बलिदान दिले आहे असं राऊतांनी सांगितले.
तसेच या देशातील ड्रग्स रॅकेट, हवाला रॅकेट, भ्रष्टाचार यावर कारवाई करण्यासाठी ईडीचे अधिकार आहे. परंतु त्याचा वापर विरोधी पक्षातील नेत्यांवर केला जात आहे. त्यावर आमचा आक्षेप आहे. विरोधी पक्षातील प्रमुख लोकांवर ईडीची कारवाई होत आहे. कोणी भ्रष्ट मार्गाने पैसे कमवत असेल तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. सत्ताधारी पक्षातील सर्व धुतळ्या तांदळाचे आहेत का? असा आमचा प्रश्न आहे असंही संजय राऊत म्हणाले.
आमदारांना दुसऱ्या पक्षात गेल्याशिवाय पर्याय नाहीकोणत्याही परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयात संविधानाविरोधात न्यायमूर्ती निकाल देणार नाही याची खात्री असल्याने १६ आमदार १० व्या शेड्युल्डनुसार अपात्र ठरतील हे नक्की आहे. त्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. मग ते स्वत:ला शिवसैनिक कसं म्हणवणार असा टोला राऊतांनी शिंदे गटातील शिवसेना आमदारांना लगावला.
तसेच दुसऱ्या पक्षात जायला किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची कल्पना आम्हाला आहे. शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झाले तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. शिवसेना सर्व निवडणुका लढवणार आहे. भाजपाला शिवसेना फोडायची होती. महाराष्ट्राला दुबळं आणि मराठी माणसाला कमजोर करण्याचं कारस्थान भाजपाचं होतं. त्यात जे यश त्यांना आले हे दिर्घकाळ टिकणार नाही असंही संजय राऊत म्हणाले.