नवी दिल्ली-
भारताच्या युवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये (CEO) समावेश असलेल्या एडलवाइज एमएफ कंपनीच्या सीईओ राधिका गुप्ता (Edelweiss MF CEO Radhika Gupta) यांच्या यशाची कहाणी खूप रोमांचक आहे. राधिका त्यांची वाकडी मान आणि भारतीय भाषेमुळे नेहमीच चेष्टेचा विषय ठरायच्या. कॉलेजनंतर नोकरी न मिळाल्यानं त्यांनी एकदा आत्महत्येचाही विचार केला होता, पण सुदैवाने तिच्या मित्रांनी घटनास्थळ गाठून त्यांना वाचवलं होतं. पण एक संधी अशी आली की नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. वयाच्या ३३ व्या वर्षी त्या एका कंपनीच्या सीईओ बनल्या.
मनीकंट्रोल डॉट कॉमच्या वृत्तानुसार राधिका गुप्ता यांनी ह्युमन्स ऑफ बॉम्बेला सांगितलं की त्यांचे वडील राजदूतावासात नोकरीला होते. त्यामुळे त्यांचं शिक्षण भारत, पाकिस्तान, अमेरिका आणि नायजेरियामध्ये झालं. नायजेरियात त्यांचे वर्गमित्र तिच्या वाकड्या मानेबद्दल आणि भारतीय उच्चारासाठी त्यांची चेष्टा करायचे. त्यांना अप्पू नावानं चिडवायचे.
"माझी नेहमी माझ्या आईशी तुलना केली जाते, जी माझ्याच शाळेत शिकवते. माझी आई एक अतिशय आकर्षक स्त्री आहे. लोक नेहमी माझी तुलना माझ्या आईशी करतात आणि म्हणतात की तू तिच्या तुलनेत खूप कुरूप दिसतेस. त्यामुळे माझ्या आत्मविश्वासाला तडा जात असे", असं राधिका यांनी सांगितलं.
७ मुलाखतीत अपयश आल्यानं आत्महत्येचा प्रयत्नवयाच्या २२ व्या वर्षी राधिका यांना कॉलेजनंतर नोकरी मिळाली नाही. १० वेळा नोकरीच्या मुलाखतीत नापास झाल्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला. "मी खिडकीतून बाहेर बघत होते आणि उडी मारणारच होते तेव्हा माझ्या मित्रांनी मला वाचवलं. ते मला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेले", असं राधिका यांनी सांगितलं. मनोरुग्णालयात डिप्रेशनवर उपचार घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. राधिकाने डॉक्टरांना नोकरीच्या मुलाखतीसाठी जायचं आहे असं सांगितल्यानंतरच वॉर्डातून डिस्चार्ज देण्यात आला. या मुलाखतीत त्या यशस्वी झाल्या आणि त्यांना मॅकेन्झीमध्ये नोकरी मिळाली.
राधिका म्हणतात की यामुळे माझं आयुष्य पुन्हा रुळावर आलं पण तीन वर्षानंतरच त्यांनी काही बदल करायचे ठरवले. वयाच्या २५ व्या वर्षी त्या भारतात परतल्या. त्यांनी आपला पती आणि मित्रासोबत स्वतःची मालमत्ता व्यवस्थापन फर्म सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. काही वर्षांनंतर, त्यांची कंपनी एडलवाईस एमएफने विकत घेतली. "मी यशस्वी होऊ लागले होते. आता संधी स्वत:हून आपला हात पुढे करत होती. म्हणून जेव्हा एडलवाईसने सीईओ शोधायला सुरुवात केली तेव्हा मीही माझ्या पतीच्या प्रेरणेनं संकोच न करता या पदासाठी अर्ज केला", असं राधिका यांनी सांगितलं. काही महिन्यांनंतर, एडलवाईसने राधिका यांची कंपनीच्या सीईओ म्हणून निवड केली. वयाच्या ३३ व्या वर्षी त्या सीईओ झाल्या होत्या.
शाररिक व्यंग हेच बनलं बलस्थानराधिका यांनी सांगितलं की, पुढच्याच वर्षी तिला एका कार्यक्रमात भाषण देण्यासाठी बोलावण्यात आलं होते. तिथं तिनं त्यांच्या बालपणातील असुरक्षिततेबद्दल आणि आत्महत्येच्या प्रयत्नांबद्दल सांगितलं. यानंतर लोकांनी राधिकासोबत त्यांच्या आयुष्याच्या गोष्टी शेअर करण्यास सुरुवात केली. राधिका आता ३९ वर्षांच्या आहेत. "माझी सर्वात मोठी उपलब्धी ही आहे की मला हे समजले आहे की माझ्यातील दोष हे माझं कमीपण नाही. त्यामुळे आता जेव्हा कोणी माझ्या लूकवर कमेंट करतं तेव्हा मी त्याला सांगते होय, मी तिरळी आहे आणि माझी मान वाकडी आहे. हेच माझं वैशिष्ट आहे. तुमच्यात वेगळंपण काय आहे?", असं मोठ्या आत्मविश्वासानं राधिका सांगतात.