नवी दिल्ली : एकीकडे महागाई प्रचंड वाढत असताना, दुसरीकडे बुधवारी घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे सरकारने बुधवारी खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी उद्योजकांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये तेलाचे दर कमी करण्याविषयी चर्चा झाली आहे.
जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे केंद्रही तेलाच्या दरात कपात करून सामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. सर्व तेल कंपन्यांनी गेल्या महिन्यात तेलाचे दर १० ते १५ रुपयांनी घटवले होते. मात्र त्यानंतरही १५ लिटर खाद्यतेल खरेदीसाठी जवळपास ३ हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे खाद्यतेल करेदी करणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.
गेल्या एका महिन्यात खाद्यतेलाचे दर ३०० ते ४५० डॉलर प्रति टनांपर्यंत कमी झाले आहेत. यामुळे सर्वच तेल कंपन्यांकडून दरात कपात होण्याची शक्यता आहे. ही कपात १० ते १५ रुपयांची असेल. - बी. व्ही. मेहता, कार्यकारी संचालक, एसईए
दरकपात अतिशय कमीजागतिक बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असली, तरी त्याचा थेट फायदा अद्याप ग्राहकांना झालेला नाही. गेल्या महिन्यात सरकारच्या सूचनेनुसार सर्व खाद्यतेल कंपन्यांनी दरात कपात केली असली, तरी अतिशय तोकडी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खाद्यतेलाच्या दरात कपात करण्याची मागणी होत आहे.