नवी दिल्ली : एअरसेल-मॅक्सिस व्यवहारातील मनी लाँड्रिंगच्या तपास प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम आणि कथितरीत्या त्यांच्याशी संबंधित एक कंपनीच्या १.६६ कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे.ईडीने स्पष्ट केले आहे की, बचत खाते आणि मुदत ठेवींच्या रूपातील ९० लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक अधिनियमानुसार (पीएमएलए) याबाबतचा अस्थायी आदेश जारी करण्यात आला आहे. अॅडव्हान्टेज स्ट्रॅटेजिक कन्स्लटिंग प्रा. लि. च्या (एएससीपीएल) नावे असलेली २६ लाखांची एक मुदत ठेवही जप्त करण्यात आली आहे. ही कंपनी कथितरीत्या कार्ती यांच्याशी संबंधित आहे आणि अन्य एका व्यक्तीच्या माध्यमातून कार्ती यांच्याकडून त्याचे नियंत्रण होते, असा दावाही ईडीने केला आहे.कार्ती यांनी गुडगाव येथील एक प्रॉपर्टी निकाली काढली आणि जप्तीची प्रक्रिया विफल करण्यासाठी काही बँक खाती बंद केली तसेच काही बँक खाती बंद करण्याचा प्रयत्न केला. एअरसेल-मेक्सिस प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याची दखल घेत ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे.कार्तीच्या मालमत्तेवर टाच आणण्यासंबंधी ‘ईडी’ने काढलेले प्रसिद्धिपत्रक हे खोटारडेपणा व कपोलकल्पित आरोपांचे वेडगळ मिश्रण आहे. मला धमकावण्याचा व माझा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. पण मी त्याला बधणार नाही. सादर झालेले एकमेव आरोपपत्र न्यायालयाने रद्द करूनही ही कारवाई कशी केली जाऊ शकते, या मुद्द्याला ‘ईडी’ने सोयीस्करपणे बगल दिली आहे. प्रत्यक्ष टाचेची नोटीस मिळाल्यावर तिला कायदेशीर आव्हान दिले जाईल. - पी. चिदंबरम,माजी केंद्रीय वित्तमंत्री
कार्ती चिदंबरम यांच्या संपत्तीवर ‘ईडी’ची टाच! १.६६ कोटी रुपयांची संपत्ती जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 2:04 AM