ऑनलाईन लोकमत
नवी दिल्ली, दि.१ - माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या कंपन्यांवर मंगळवारी सक्तवसुली संचलनालय आणि आयकर खात्याने छापे मारले.
ऑगस्ट महिन्यात एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित असलेल्या अॅडव्हानटेज स्ट्रॅटजिक कन्सल्टिंग कंपन्यांच्या दोन संचालकांना सक्तवसुली संचलनालयाकडून समन्स बजावण्यात आले होते.
सन नेटवर्क समूहातील कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केल्यानंतर मागच्यावर्षी इडीने डिसेंबर महिन्यात माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन आणि त्यांचे बंधू कलानिधी मारन यांची चौकशी केली होती.
सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली २०१२ मध्ये राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी चिदंबरम यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या अॅडव्हानटेज स्ट्रॅटजिक कन्सल्टिंग कंपनीने एअरसेलला पैस दिल्याचा आरोप केला होता. मलेशियन कंपनी मॅक्सिसकडून एअरसेलमध्ये मोठी गुंतवणूक होण्याच्या काहीदिवस आधी हा व्यवहार झाला होता असा आरोप जेटली यांनी केला होता.