पतियाळा : महिलांना अमानवी वागणूक दिल्याप्रकरणी अमृतसरमधील तीन पोलिसांना न्यायालयाने तुरुंगवास ठोठावला. या पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी तीन महिलांच्या कपाळावर ‘जेब कतरी’ ‘खिसेकापू’ गोंदवले होते. विशेष न्यायमूर्ती बलजिंदरसिंग यांनी पोलीस अधीक्षक सुखदेवसिंग चिन्ना व पोलीस उपनिरीक्षक नरिंदरसिंग यांना ३ वर्षांचा, तर सहायक फौजदार कंवलजितसिंग यांना एक वर्षाचा कारावास ठोठावला. या महिला खिसे कापताना पकडल्या गेल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या कपाळावर ‘जेब कतरी’ असे गोंदवले. चोरीच्या प्रकरणात न्यायालयात त्या चौघींना आणले असता पोलिसांनी या चौघींचे कपाळ ओढणीने झाकले; मात्र एकीने कपाळावरील गोंदलेली अक्षरे न्यायाधीशांना दाखविली आणि त्यानंतर ही घटना राष्ट्रीय मुद्दा बनली. पंजाब पोलीस टीकेचे धनी झाले. सरकारने त्यांच्या कपाळावरील गोंदलेले काढण्यासाठी प्लास्टिक सर्जरीही केली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घेत राज्य सरकारकडे अहवाल मागितला. आयोग या प्रकरणात १९९४ मध्ये उच्च न्यायालयात स्वत:हून पक्षकार बनला. आयोगाच्या मागणीवरून याची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली. सीबीआयने २०१५ मध्ये याची चौकशी सुरू करून दोषारोपपत्र दाखल केले होते. ‘आम्ही सुवर्णमंदिराकडे जात होतो, तेव्हा सहायक फौजदार कंवलजितसिंग यांनी आम्हाला अडवून अटक केली आणि नंतर पोलिसांनी आमच्या कपाळावर जेब कतरी असे गोंदवले’, असे या महिलांनी न्यायालयात सांगितले. या महिलांनी पुन्हा चोरी करू नये म्हणून शेजाऱ्यांनी त्यांच्या कपाळावर जेब कतरी असे गोंदवले होते, असा दावा पोलिसांनी केला होता. (वृत्तसंस्था)
पंजाबमधील ३ पोलिसांना २३ वर्षांनी शिक्षा
By admin | Published: October 09, 2016 12:27 AM