जबलपूर: मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये शिक्षण विभागाच्या बेजबाबदारपणाचा नमुना पाहायला मिळाला आहे. बीएड प्रशिक्षणादरम्यान चार मृत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचा आणि त्यांची हजेरीदेखील लावण्यात आल्याचा प्रकार जबलपूरमध्ये घडला आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षण दरम्यान मृत शिक्षकांचं वेतनपत्रदेखील तयार करण्यात आलं. ही बातमी समोर येताच शिक्षण विभागात खळबळ उडाली. यानंतर महाविद्यालयाकडून एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यांनी पूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
कोरोना संकट काळात बीएड शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जात होतं. प्रांतीय शिक्षण महाविद्यालयात ऑनलाईन प्रशिक्षण सुरू होतं. महिन्याभराच्या प्रशिक्षणादरम्यान ४ शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतरही शिक्षण प्रशिक्षणात चारही मृत शिक्षकांची हजेरी लावली जात होती. इतकंच नव्हे, तर त्यांचं पगारपत्रकदेखील तयार करण्यात आलं. प्राचार्य आर. के. स्वर्णकार यांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी याचं खापर कर्मचाऱ्यांवर फोडलं.
'कोरोना काळात ऑनलाईन क्लासेस सुरू होते. ऑनलाईन क्लास दरम्यान कधी-कधी नेटवर्कची समस्या निर्माण होते. इंटरनेट कनेक्शनमध्ये अडथळे येतात. त्यामुळे चूक झाली असावी. विभागीय समितीचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणी कारवाई केली जाईल,' अशी सारवासारव स्वर्णकार यांनी केली. या प्रकरणात स्वर्णकार यांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांकडून इतकी गंभीर चूक झाली असताना प्राचार्य स्वर्णकार यांना त्याची कल्पना नव्हती. त्यांनी या घटनेचं खापर पूर्णपणे कर्मचाऱ्यांवर फोडलं आहे.