नितीन अग्रवाल, नवी दिल्लीमनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नव्या शिक्षण धोरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमपत्रिकेला खो दिला आहे. नव्या शिक्षण धोरणावर चर्चेसाठी रा.स्व. संघ परिवारातील संघटनांद्वारे आयोजित परिषदेत त्यांनी शिक्षण हा संपूर्ण राष्ट्राचा विषय असल्याचे ठणकावले. एवढेच नाही, तर उत्कृष्ट शिक्षण धोरण आखण्यासाठी भाजपा, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीसह सर्वांनी पक्षहिताला फाटा देऊन राष्ट्रहितासाठी पुढे यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. आपण लोकशाहीचे पाईक आहोत, असे सांगून त्यांनी शिक्षण धोरणावरील पहिल्या भाषणाची सुरुवात केली. शिक्षण जीवनाला आकार देणारे असावे. मुलांचे भविष्य चांगले व्हावे यासाठी गरीब आई-वडील पोटाला चिमटे घेऊन मुलांना शिकवितात. त्यामुळे हा भाजपा, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचा विषय नाही, तर राष्ट्रीय विषय असून, यात सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे. संघ परिवारातील भारत शिक्षण मंडळ आणि भारत निती या संघटनांनी नवीन शिक्षण धोरणावर चर्चेसाठी आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-अपेक्षा आणि आव्हाने’ या परिषदेत जावडेकर यांच्याशिवाय भाजपाचे अतिरिक्त सरचिटणीस मुरलीधर राव, संघाचे मुकुल कानिटकर आणि एनसीईआरटीचे माजी संचालक जे.एस. ठाकूर प्रमुख वक्ते म्हणून सहभागी झाले होते. ठाकूर यांनी सरकारी शाळाप्रणाली भक्कम करण्यावर जोर दिला. भारताच्या सर्वंकष विकासाचा मार्ग गावच्या सरकारी शाळेतूनच जायला हवा; अन्यथा विद्यमान व्यवस्था वर्गभेदालाच जन्म देईल. सरकारी शाळांच्या स्थितीत सुधारणा होणार नाही तोपर्यंत बौद्धिक संपदा विकसित होऊ शकत नाही, असेही ठाकूर म्हणाले. मुकुल कानिटकर यांनी संपूर्ण शिक्षणव्यवस्था शिक्षकांच्या हातात सोपविण्याची मागणी करून शिक्षणव्यवस्थेचे सामाजिकीकरण करण्यावर भर दिला. मुरलीधर राव म्हणाले की, देशात सर्व वर्गांना समान अधिकार आहे. त्यामुळे येथील शिक्षणव्यवस्थेत विशेष शिक्षणप्रणाली चालू शकत नाही. भारतीय भाषांना महत्त्व देण्याची गरज असल्याचे सांगून नव्या धोरणात संस्कृतला पुनरुज्जीवित करण्याचा सल्ला त्यांनी दिला.आरोपाच्या भीतीमुळे संघाचे गुण कापले जातील?1जावडेकर यांनी निवृत्त प्राथमिक शिक्षिका असलेल्या त्यांच्या आईसोबतचा एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले की, मी चौथीच्या वर्गात असताना माझ्या वर्गाच्या उत्तरपत्रिका आईकडे तपासणीसाठी आल्या. आईने त्याबाबत काहीही सांगितले नाही; परंतु निकाल मिळाल्यानंतर मला कळले की, सर्व उत्तरे बिनचूक असूनही आईने दोन गुण कापले होते. 2याबाबत आईला असे का केलेस म्हणून विचारले असता, मुलगा असल्यामुळे दोन गुण जास्त दिल्याचा आरोप होऊ नये म्हणून गुण कापले होते, असे उत्तर मिळाले. या घटनेच्या उल्लेखाचे अनेक अर्थ काढण्यात येत आहेत. 3जावडेकर यांनी या उदाहरणाद्वारे आरोपाच्या भीतीमुळे संघाचे गुण कापले जातील, असा संदेश संघ प्रचारकांना देण्याचा प्रयत्न केल्याचे मानण्यात येते. प्रस्तावित शिक्षण धोरणाबाबत सूचना मागविण्यात आल्या असून, अधिकाधिक लोकांनी सरकारला सूचना कळवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षण पक्षाचा नाही, तर देशाचा विषय!
By admin | Published: July 15, 2016 2:30 AM