ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ : चर्चा ही आंदोलने टाळण्याची गुरुकिल्ली आहे, असे सांगून नवे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्या कामाची दिशा कोणती राहील याची बुधवारी झलक दाखवली. शिक्षण हा पक्षीय राजकारणाचा विषय नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. जावडेकर यांनी स्मृती इराणी यांचे स्थान ग्रहण केले. आपल्या नव्या जबाबदारीबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सूचना व सल्ला मसलतीसाठी आपले दरवाजे उघडे आहेत. इराणी यांनी घेतलेल्या निर्णयांची त्यांनी प्रशंसा केली. हे निर्णय पुढे नेण्यासाठी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, असे ते म्हणाले. ‘मी विद्यार्थी आंदोलनातून पुढे आलेलोे आहे. त्यामुळे मी सर्वांशीच चर्चा करणार आहे. चर्चेतून मार्ग निघतोच.
त्यामुळे आंदोलनाची गरजच रहाणार नाही’, असे त्यांनी सांगितले. इराणी यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. जेएनयूचा वाद असेल किंवा दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या मृत्यूनंतर हैदराबाद विद्यापीठात पेटलेले आंदोलन. प्रत्येक वादात इराणी यांचे नाव ओढले गेले. विरोधी पक्षांनी त्यांच्यावर त्या शिक्षणाचे भगवेकरण करीत असल्याचा आरोपही केला. मी ही नवी जबाबदारी अत्यंत विनम्रपणे स्वीकारतो. मी आमचे पूर्वपदस्थ मुरली मनोहर जोशी यांच्याशीही चर्चा करणार आहे. जोशी हे भाजपचे माजी अध्यक्ष असून, सध्या पक्षाच्या मार्गदर्शक मंडळात त्यांचा समावेश आहे.
शिक्षण हे विद्यार्थिकेंद्रित आणि त्याने सर्जनशीलतेला चालना देणारे असायला हवे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून नवे शिक्षण धोरण आखण्यात येत आहे. त्या मुद्याबाबत बोलताना जावडेकर म्हणाले की, आम्हाला आमची शिक्षणप्रणाली अधिक नावीन्यपूर्ण करायची आहे. शिक्षणाचा दर्जा वाढायला हवा यावर त्यांनी जोर दिला.