नवी दिल्ली: काेराेना महामारीमुळे जगभरातील शाळा बंद पडल्या हाेत्या. आता १९ महिन्यांनी हळूहळू शाळा सुरू हाेत आहेत. मात्र, जगातील केवळ ५४ टक्केच शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थिती सुरू झाली आहे. तर ३४ टक्के शाळांमध्ये हायब्रीड माॅडेलचा वापर केला जात आहे. काेविड १९ ग्लाेबल एज्युकेशन ट्रॅकरने ही माहिती दिली आहे.जागतिक बँक, युनिसेफ आणि जाॅन्स हाॅपकिन्स विद्यापीठातर्फे या ट्रॅकरची स्थापना करण्यात आली आहे. जगभरातील २०० हून अधिक देशांमधील परिस्थितीचा आढावा ट्रॅकरच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. ट्रॅकरद्वारे मिळालेल्या माहितीनुसार विविध देशांना मदत करता येईल, हा यामागील हेतू आहे. ट्रॅकरच्या माहितनुसार, ८० टक्के शाळांमध्ये नियमित शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. मात्र, त्यापैकी ५४ टक्के शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती सुरू झाली आहे. तर ३४ टक्के शाळा हायब्रीड माॅडेलचा वापर करत असून १० टक्के शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग हाेत आहेत. २ टक्के शाळांमध्ये शिक्षण सुरूच नाही. महत्त्वाचे म्हणजे, ५३ टक्के देशांनी काेराेना महामारीमध्ये शिक्षणाला प्राधान्य दिले आहे.शाळा पुन्हा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांसह संपूर्ण कर्मचारी वर्गाचे संपूर्ण लसीकरण हाेणे आवश्यक असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. तसेच मास्क आणि अंतर ठेवून संसर्गाचा धाेकाही कमी करण्यावर भर दिला आहे.
Education: जगभरात केवळ 54 टक्के शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग सुरू, ३४ टक्के शाळांत हायब्रीड माॅडेल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 10:45 AM