नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज (1 फेब्रुवारी 2022) रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना काय काय मिळणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. याच दरम्यान विज्ञानाची प्रगती आणि टेक्नॉलॉजी आपल्याला कशा पध्दतीने एकत्र आणू शकते याचा प्रत्यय कोरोना महासाथीमध्ये पाहायला मिळाला. शालेय शिक्षण असो की उच्च शिक्षण, सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनमुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीऐवजी डिजिटल पद्धतीने अभ्यास आणि परीक्षा घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर शालेय आणि उच्च शिक्षणात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची प्रक्रियाही देशात सुरू आहे. अशातच अर्थमंत्र्यांनी शालेय शिक्षणासाठी 100 चॅनेल्स सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.
कोरोनामुळे देशातील छोट्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं आहे. 'वन क्लास वन टीव्ही चॅनल'द्वारे प्रयत्न केले जाणार आहेत. शालेय शिक्षणासाठी 100 चॅनेल्स सुरू करणार. विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत शिकवणार. रेडिओ, टीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. वन क्लास वन टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पहिली ते बारावीसाठी चॅनेल सुरू करणार. प्रादेशिक भाषांमध्ये हे चॅनेल काम करतील. यासाठी इंटरनेट रेडिओ आणि डिजिटल साधनांचा वापर करण्यात येईल असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.
डिजिटल विद्यापीठ सुरू करणार असून हे विद्यापीठ देशातील प्रादेशिक भाषांमध्ये सुरू होणार आहे. ई कंटेन्ट तयार करण्यासाठी देशातील मोठी विद्यापीठ आणि सरकार एकत्र काम करणार असल्याचं असं देखील निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. कोरोनाकाळात मानसिक समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे देशात 21 मानसिक समस्या समुपदेशन केंद्र सुरू करणार आहे. तसेच देशातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामधून देशात 60 लाख नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.