ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक क्षेत्रात मंदीचे वातावरण आल्याचे वृत्त तुम्ही पाहिले किंवा ऐकले असेलच. नोटाबंदीमुळे लाचखोरीवरही परिणाम झाला आहे. चलनतुटवड्यामुळे लाच घेणे आणि देणे अवघड बनले आहे. त्यामुळे लाचखोरांनी लाच घेण्यासाठी नवी क्लुप्ती योजली असून, त्यांनी हप्त्यांमध्ये लाच घेण्यास सुरुवात केली आहे.
सीबीआयच्या चौकशीत ही बाब उघड झाली आहे. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्राप्तिकर विभागाच्या एका अधिकाऱ्याने हप्त्यांमध्ये लाच घेतल्याचे समोर आले आहे. या अधिकाऱ्याचे नाव बी. श्रीनिवास राव आहे. त्याने एका व्यक्तीकडे दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र नोटाबंदीमुळे एकरकमी लाच देणे शक्य नसल्याचे सांगितल्यावर श्रीनिवास याने त्यास हप्त्यांमध्ये लाच देण्यास सांगितले. पण या लाचेचा पहिलाच हप्ता घेताना सीबीआयने त्याच्या मुसक्या आवळल्या.