हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वाटपावरून इंडिया आघाडीच्या सहकाऱ्यांमध्ये मतभेद असूनही, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत जाहीरपणे बोलणे बंद केले आहे.
काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी पक्षांतर्गत चर्चेतून प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत नमते घेतल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही असेच संकेत दिले आहेत. ते म्हणाले, कोण किती जागा लढवतो हे महत्त्वाचे नाही; सत्ताधाऱ्यांचा पराभव करणे महत्त्वाचे आहे. २३ जागा लढवण्याचा आग्रह शिवसेना धरणार का, असे विचारले असता ते म्हणाले की, संख्येला महत्त्व नाही. थांबा आणि पाहा. आमच्याकडे नवीन सहयोगी असू शकतात.
प्रकाश आंबेडकरही महाविकास आघाडीत?
महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे देखील महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकतात, अशी माहिती आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एमआयएमसोबत एकत्र निवडणूक लढली होती. त्यावेळी दोन्ही पक्षांनी सर्व ४८ जागा लढवून ७.६५ टक्के मते मिळविली होती. यावेळी वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीसोबत निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. या बाबत इंडिया आघाडीने मात्र, अजून निर्णय घेतलेला नाही.
२०१९ मध्ये कोणत्या पक्षाला, किती जागा?
- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या आणि १८ जागा जिंकल्या होत्या. त्यांना २३.५ टक्के मते मिळाली होती. तर, भाजपने २५ पैकी २३ जागा जिंकल्या होत्या.
- शिवसेनेचे बहुसंख्य खासदार शिंदे यांच्या गटासोबत गेले असले तरी उद्धव ठाकरे यांचा गट २३ जागा लढवण्याचा आग्रह धरत होता. परंतु, अलीकडे त्यांनी या मागणीबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे आणि केवळ जिंकण्याच्या निकषांवर चर्चा सुरू आहे.
- २०१९ मध्ये एमआयएम एक शक्ती म्हणून महाराष्ट्रात उदयास आली. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला हानी पोहोचवली. तर, त्यांचे उमेदवार इम्तियाज जलील हे विजयी झाले.
- काँग्रेसने २५ जागा लढवल्या. त्यांना १६.४१ टक्के मते मिळाली. पण, एकच जागा जिंकता आली. राष्ट्रवादीने १९ जागांवर निवडणूक लढवली आणि १५.६६ टक्के मते मिळवत ४ जागा जिंकल्या. राष्ट्रवादीने अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना पाठिंबा दिला. त्यांनी नंतर भाजपशी हातमिळवणी केली.