नवी दिल्ली : जगभरातील देशांमध्ये आज ईद-उल-फित्रचा सण साजरा करण्यात येत आहे. रमजानचे तीस रोजे पूर्ण झाले असून आज मुस्लीम बांधव उत्साहात ईद साजरी करत आहेत. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मुस्लीम बांधव घरातच राहून ईद साजरी करत आहेत. तर सोशल डिस्टंसिंगचेही पालन करण्यात येत आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातूनही लोक एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, "ईद-उल-फितरच्या शुभेच्छा. या खासप्रसंगी करुणा, बंधुता आणि सौहार्दाची भावना आणखी वाढावी. प्रत्येकाने निरोगी आणि समृद्ध राहावे."
यंदाची ईद खूप वेगळी असेल. पहिल्यांदाच असे होईल, ज्यावेळी लोक त्यांच्या घरी ईद साजरी करतील, असे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, "कोरोनाच्या साथीमुळे आम्ही आमच्या घरी ईद साजरी करणार आहोत आणि घरीच नमाज पठण करणार आहोत. लवकरात लवकर देश कोरोनापासून मुक्त व्हावा, अशी आम्ही प्रार्थना करणार आहोत."
दरम्यान, रमजानचा महिना पूर्ण झाल्यावर ईद साजरी केली जाते. 29 किंवा 30 दिवसांचे रोजे पूर्ण झाल्यावर चंद्र दर्शन झाल्यावरच ईद साजरी केली जाते. सौदी अरेबिया, युएईसह सर्व आखाती देशांमध्ये ईदचा चंद्र 23 मे रोजी दिसला, त्यानंतर ईद 24 मे रोजी साजरी करण्यात आली. भारतात 24 मे रोजी ईदचा चंद्र दिसल्यानंतर संपूर्ण देशात ईदचा सण आज साजरा होत आहे.