ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. १९- कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथे गुरुपौर्णिमेनिमीत्त दत्त दर्शनासाठी निघालेल्या उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील नऊ जणांवर काळाने झडप घातली आहे. आळंद तालुक्यातील लाडचिंचोली येथे भाविकांची क्रूजर आणि ट्रकची समोरासमोर धडक होवून नऊजण जागीच ठार झाले आहेत. तर आठ जण गंभीर जखमी असून त्यातील चौघांची प्रकृती अत्यावस्त आहे. मयतांमध्ये दोन लहान मुले, चार महिला आणि तीन पुरूषांचा समावेश आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील इंगळे कुटूंबातील सदस्य गुरुपौर्णिमेनिमित्त मंगळवारी सकाळी गाणगापूरला रवाना झाले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्यातील आळंद तालुक्यातील लाडचिंचोली या गावानजीक भाविकांची गाडी (एमएच २५, आर ४५८३) आणि ट्रक यांच्यात समोरासमोर जोराची धडक बसली. यात नऊ जणांचा जीव गेला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की भाविकांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. मयतांना गाडीचा पत्रा कापून बाहेर काढावे लागले. मयतांमध्ये पाच वर्षीय चिमुकल्यांसह चार महिला आणि पाच पुरूषांचा समावेश आहे. या अपघातात संजय शिवाजी इंगळे (वय ३३), वर्षा प्रभाकर ढोबळे (वय ३०), सगजाबाई पंढरी आळंदे (वय ६२), कांताबाई शिवाजी इंगळे (वय ६३), कृष्णा संजय इंगळे (वय ५), गजाबाई श्रीमंत इंगळे (वय ६०), स्वप्नील प्रभाकर ढोबळे (वय ४, सर्व रा. कनगरा), फुलचंद शिवाजी धरणे (रा. शिवाजीनगर) व अन्य एक जणाचा समावेश आहे.
कनगरा गावावर शोककळा...
गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तदर्शनासाठी निघालेल्या एकाच कुटूंबातील नऊ जणांवर काळाने घाला घातल्याने कनगरा गावावर शोककळा पसरली आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या एकाच घरातील भाविकांचा अपघातात एवढ्या मोठ्या संख्येने जीव जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची वार्ता कळाल्यापासून ग्रामस्थ एकत्रित जमा होवून मयतांच्या पार्थिवांची वाट पाहत होते. अनेकांना या घटनेची माहिती कळताच मोठा धक्का बसला आहे. दरम्यान गावचे पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले असून मयतांना गावाकडे आणण्याची तयारी सुरु आहे. जखमींवर गुलबर्गा येथील कलबुर्गी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.