नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित महागाईचा दर किंचित घसरून १३.५६ टक्के राहिला. नोव्हेंबरमध्ये तो १४.२३ टक्के होता. मात्र, सलग नवव्या महिन्यात तो १० टक्क्यांच्या वर राहिला आहे. भाज्यांच्या घाऊक किमतीतील वाढीचा दर तब्बल ३१.५६ टक्के झाला. नोव्हेंबरमध्ये तो अवघा ३.९१ टक्के होता. याचाच अर्थ डिसेंबरमध्ये भाज्यांचे दर ८ पट वाढले आहेत.
ब्लूमबर्गने नोव्हेंबरमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, भारतातील महागाईचा दर ३० वर्षांच्या उच्चांकावर गेला आहे. डिसेंबर १९९१ नंतरचा हा सर्वाधिक महागाई दर ठरला होता. डिसेंबर २०२१ मध्ये वस्तू उत्पादन क्षेत्राची महागाई १०.६२ टक्के राहिली. नोव्हेंबरमध्ये ती ११.९२ टक्के होती. मासे, मटण आणि अंडी यांचा महागाईचा दर ६.६८ टक्के राहिला. नोव्हेंबरमध्ये तो ९.६६ टक्के होता.
खाद्यक्षेत्रातील महागाईचा दर ६.७० टक्क्यांवरून वाढून ९.२४ टक्के झाला आहे. गेल्यावर्षी एप्रिलपासून घाऊक महागाईचा दर १० टक्क्यांच्या वर आहे. नोव्हेंबरमध्ये तो सर्वाधिक १४.२३ टक्के होता. किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर वाढून ५.५९ टक्के झाला आहे. नोव्हेंबरमध्ये तो ४.९१ टक्के होता.
या वस्तू महागल्या
वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, खाद्यतेले, धातू, खनिज तेल, रसायने, खाद्य उत्पादने, कपडे आणि कागदाच्या किमती महागल्या आहेत. भाज्यांच्या श्रेणीत कांद्याच्या किमती ३०.१० टक्क्यांवरून घटून १९.०८ टक्क्यांवर आल्या. बटाट्याचे दरही घसरले आहेत. इंधन आणि विजेचे दर ३९.८१ टक्क्यांवरून ३२.३० टक्क्यांवर आले आहेत.