हरीश गुप्तानवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल रविवारी सकाळी १० वाजता होणार असून, त्याची सगळी तयारी झाली आहे. हे वृत्त दिले जाईपर्यंत आठ मंत्र्यांनी राजीनामे दिले होते, आणखी दोघे राजीनामा देण्याची शक्यता आहे. कलराज मिश्रा, उमा भारती, बंडारू दत्तात्रय, राजीवप्रताप रुडी, फग्गनसिंह कुलस्ते, संजीव बलियां आणि महेंद्रनाथ पांडे यांनी मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत.रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा सादर केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बांधले गेले आहेत. कृषिमंत्री राधामोहन सिंह यांचेही नाव घेतले जात असले तरी पद सोडायला सांगितल्याचा त्यांनी इन्कार केला.मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांचेही पद धोक्यात आहे. कुशवाह हे कुर्मी समाजाचे असून, बिहारमधील कुर्मी समाजाच्या राजकारणासाठी नितीशकुमार यांना ते मंत्रिमंडळात नको आहेत. मोदी यांनी शुक्रवारी सायंकाळी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांशी राजकीय परिस्थितीबद्दल चर्चा केली. या बैठकीस अरुण जेटली, नितीन गडकरी, राजनाथसिंह उपस्थित होते.जेटली यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी असलेले संरक्षण मंत्रिपद कोणाला दिले जाणार हे अजून स्पष्ट नाही. संवेदनशील असे संरक्षणमंत्रिपद सांभाळण्यास कमालीची सक्षम व्यक्ती पक्षात कोणी नाही. आर.सी.पी. सिंह यांच्यासह जनता दलाचे (संयुक्त) दोन जण मंत्रिमंडळात समाविष्ट केले जातील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भाजपच्या नेतृत्वाने संपर्क साधलेला नाही. त्याचा अर्थ शिवसेनेच्या कोणाचाही मंत्रिमंडळात समावेश केला जाणार नाही. अखिल भारतीय अण्णा द्रमुकच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाला वेळ आहे.राजस्थानचे ओम माथूर हे मोदी यांचे पक्षात विश्वासू आहेत. ते राज्यसभा सदस्य असून, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकेल. नितीन गडकरी यांना रेल्वे मंत्रालयात हलवले जाईल, असे असले तरी त्यांनी मोदी यांना सध्याच्या मंत्रालयाचे अपूर्ण काम व्हायचे आहे, असे सांगितल्याचे कळते. माथूर यांना रस्ते वाहतूक मंत्रालय दिले जाईल.मंत्रिमंडळात खालील नावांचा समावेश होऊ शकेल. विनय सहस्रबुद्धे (महाराष्ट्र), भारती स्थल (गुजरात), अनुराग ठाकूर (हिमाचल प्रदेश), शोभा करंदलजे (कर्नाटक), हेमंत बिस्व सरमा (आसाम), सत्यपाल सिंह आणि हरीश द्विवेदी (उत्तर प्रदेश), प्रल्हाद पटेल (मध्यप्रदेश) आणि शशीकांत दुबे (बिहार).सुरेश प्रभू यांना आपल्याला जलस्रोत आणि गंगा शुद्धीकरण किंवा पर्यावरण व वन मंत्रालय दिले जाईल, याचे संकेत नाहीत. पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांना कॅबिनेट दर्जा दिला जाऊन सुखद धक्का मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.उमा भारती नाराज; बोलायला तयार होईनातराजीनाम्याचा निर्णय माझा नव्हे, तर पक्षाचा होता आणि पक्षाचा आदेश मी पाळला, असे राजीव प्रताप रुडी यांनी सांगितले. पक्षाने सांगताच मी एका ओळीचा राजीनामा पाठवून दिला, असे संजीव बलियां यांनीही सांगितले. राजीनामा देण्यास का सांगितले,हे मला माहीत नाही, असे सांगतानाच, पक्षादेश पाळल्याचा मला आनंद आहे, असे ते म्हणाले. उमा भारती यांना राजीनाम्याविषयी विचारता त्या म्हणाल्या की, मी याचे उत्तर देणार नाही. मी काही सांगू इच्छित नाही, मला कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही. इतकेच काय, मी तुमचा प्रश्नच ऐकलेला नाही.
केंद्रीय मंत्रिमंडळात आठ नवे चेहरे?, रेल्वे गडकरींकडेच; सुरेश प्रभूंना कोणते खाते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 6:16 AM