नागपट्टनम- तामिळनाडूच्या बस डेपोतील विश्रांतीगृहाच्या छताचा काही भाग कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या तीन जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं.चाळीस वर्ष जुनी ही बस डेपोची इमारत असून शुक्रवारी सकाळी या इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला. तामिळनाडू राज्य परिवहन मंडळाची ही इमारत आहे. नागपट्टनम जिल्ह्यातील पोरयारमध्ये ही इमारत असून शुक्रवारी पहाटे ही दुर्घटना घडली.
मृत्यू झालेले आणि जखमी हे बसचे चालक आणि वाहक आहेत. ड्यूटीनंतर इमारतीत ते आराम करत होते. मध्यरात्री साडेतीन वाजता इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुनीयप्पन, चंद्रसेखर, प्रभाकर, रामालिंगमस मनीवन्नन, धनपाल, अन्बारसन आणि बाळू अशी मृतांची नावे आहेत. तर व्यकंटेशन, सेन्थिल आणि प्रेमकुमार अशी जखमींची नावं आहेत. त्यांना नागपट्टनम सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
पोरयार पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या नागपट्टनम आणि मइलादुथुराईमधील जवानांनी बचाव कार्य केलं. पोरयारमध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस झाला त्यामुळे इमारत कमकुवत झाली, असं पोलिसांचं मत आहे.
दरम्यान,मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी शुक्रवारी दुपारी मृत कर्मचाऱ्यांना साडेसात लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमींना दीड लाख रुपये तर किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. तसंच मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री ई.पलानीस्वामी यांनी केली आहे.