नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. मात्र आता अशातच एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. एका 8 वर्षांच्या चिमुकल्यावर रिक्षा चालवण्याची वेळ आली आहे. कुटुंबाची जबाबदारी असल्याने त्यांचं पोट भरण्यासाठी हैद्राबादमधील अवघ्या आठ वर्षांचा मुलगा ई-रिक्षा चालवत आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने शाळेचा ड्रेस परिधान करून या चिमुकल्याला ई-रिक्षा चालवताना पाहिलं. तो दोन जणांना घेऊन जात होता. हे पाहताच त्या व्यक्तीला थोडा धक्का बसला. त्या व्यक्तीने रिक्षा थांबवली आणि याबाबत विचारणा केली. तेव्हा चिमुकल्याने आपल्यावर आलेल्या परिस्थितीची माहिती दिली.
गोपाळ कृष्ण असं या आठ वर्षांच्या मुलाचं नाव असून तो इयत्ता तिसरीमध्ये शिकतो. कुटुंबाला जगवण्यासाठी, त्यांचं पालनपोषण कऱण्यासाठी हैद्राबादमध्ये ई-रिक्षा चालवत असल्याची माहिती मुलाने दिली आहे. या चिमुकल्याचे आई-वडील दोघेही दिव्यांग आहेत. आणि त्याला भाऊ-बहीण देखील आहेत. या सर्वांच्यात गोपाळ मोठा आहे. त्यामुळे घरच्या सर्वांची जबाबदारी ही त्याच्यावर आहे. गोपाळ कृष्णने अभ्यास करुन झाला की मी माझ्या आई-बाबांना ई-रिक्षामधून घेऊन जातो असं सांगितलं आहे.
मोठा मुलगा या नात्याने माझ्या कुटुंबाची मदत करणं ही माझी जबाबदारी असल्याचं देखील त्याने म्हटलं आहे. गोपाळ कृष्णचे दिव्यांग आई-वडील हे चंद्रगिरी शहरात वेगवेगळ्या भागात भाजीपाला आणि किराणा माल विकतात. गोपाळच्या वडिलांनी मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही दृष्टिहीन आहोत. आम्हाला तीन मुलं आहेत आणि मोठा मुलगा त्याचा अभ्यास संपवून आम्हाला पैसे कमवण्यासाठी मदत करतो असं म्हटलं आहे. या दोघांची ही तिन्ही मुलं शारिरीकदृष्ट्या सुदृढ आहेत आणि हे दाम्पत्य आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप मेहनत घेत आहे.
केवळ आठ वर्षांचा चिमुकला चालवतोय रिक्षा
गोपाळच्या वडिलांनी आम्हाला असं वाटतं की सरकारने आमची पेन्शन वाढवायला हवी. सध्या आम्हाला पेन्शन म्हणून फक्त तीन हजार रुपये मिळतात, आणखी मदत करा असं म्हटलं आहे. गोपाळ कृष्ण आपल्या आईबाबांना चंद्रगिरी शहरात सोडतो जिथे ते आपल्याकडच्या वस्तू विकतात. काही दिवसांपूर्वीच त्याला पोलिसांनी पकडलंही होतं आणि तो हे वाहन पुन्हा चालवणार नाही असं आश्वासन घेऊन त्याला सोडलं असल्याचं म्हटलं आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.