कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या शाळा सुरू करण्याला अद्यापही काही राज्यांनी परवानगी दिली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळा अद्यापही बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ऑनलाईन वर्गात आपल्याला शिकवलेलं काहीच कळत नाही असं लिहून गुजरातमधील सुरत येथे राहणाऱ्या एका तंबाखू विक्रेत्याच्या मुलान पळ ठोकला. आई-वडिल बाहेर गेले असताना त्यानं कथितरित्या घर सोडल्याचं समोर आलं आहे. हा विद्यार्थी आठवीत शिकत होता.सोमवारी आपल्या सुरत येथील घरातून बेपत्ता झालेला १४ वर्षाचा मुलगा आपल्या घरापासून जवळपास २८० किलोमीटर दूर मुंबईनजीकच्यामीरा-भाईंदर परिसरात सापडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही अंतरापर्यंत सायकलवरून आणि काही अंतर ट्रकमधून पार करत तो मीरा-भाईंदर परिसरापर्यंत पोहोचला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सुरतमध्ये राहणारा हा विद्यार्थी ऑनलाईन वर्ग आणि नोट्सना कंटाळला होता. यामुळेच तो घर सोडून पळाला असल्याचंही त्यांनी सांगितलं. ज्यावेळी तो बेपत्ता झाला तेव्हा त्याच्या वडिलांना त्या मुलाचा फोन आणि एक नोट सापडली. "आई-बाबा मी तुम्हाला खुप त्रास दिला आहे. आता मी खुप दूर जात आहे. ऑनलाईन वर्गातून मला काहीच समजत नाही. याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो," असं कथितरित्या त्या नोटमध्ये लिहिलं असल्याचं पोलिसांनी नमूद केलं. दरम्यान, पोलिसांनी त्याच्या सोसायटीचं सीसीटीव्ही फुटेजही तपासल. त्यामध्ये तो केवळ एक बाटली पाणी घेऊन आपल्या सायकलवरू जात असल्याचं पोलिसांना दिसून आलं होतं. तो मुलगा घरातून बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. "आपण पाच वर्षभरापूर्वीच मुंबईतून सुरतमध्ये राहण्यास आलो आहोत. यापूर्वी भाईंदर येथे आम्ही राहत होतो," असं त्याच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितलं. दरम्यान, माहिती मिळाल्यानंतर त्या मुलाचे कुटुंबीय मुंबईसाठी रवाना झाले. "ऑनलाईन शिकवण्यात येणाऱ्या वर्गांमध्ये त्याला काहीही समजत नव्हतं हे तो घरातून पळून जाण्यामागील मुख्य कारण होतं. आम्ही त्याच्या मोबाईलच्या वापराचाही तपास करू. पण घरातील कोणीही त्याच्यावर अभ्यासाठी दबाव आणला नाही," अशी प्रतिक्रिया मुलाच्या वडिलांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार तो मुलगा २० किलोमीटरपर्यंत सायकलवर गेला. त्यानंतर महामार्गावरून त्यानं नवसारीसाठी लिफ्ट मागितली. त्यानंतर पुन्हा त्यानं थोडा सायकलवर प्रवास केला. त्यानंतर तो ट्रकमधून लिफ्ट घेत महाराष्ट्रात पोहोचला. सध्या मुलाचे आईवडिलही मुंबईत पोहोचले आहेत.
'ऑनलाईन वर्गात काहीच समजत नाही,' असं लिहून घरातून पळाला आठवीचा विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 12:50 PM
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सुरू आहे ऑनलाईन शिक्षण
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सुरू आहे ऑनलाईन शिक्षणकाही वर्षांपूर्वीच कुटुंबीय मुंबईतून सुरतमध्ये झाले होते स्थायिक