कला अकादमीत रविवारी ‘एकांकिका महोत्सव’
By admin | Published: February 03, 2016 12:28 AM
पणजी : कला अकादमी गोवा व उत्कर्ष सेवा मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 7 रोजी मुंबई येथील निमंत्रित 8 संस्थांचा समावेश असलेला ‘एकांकिका महोत्सव’ कला अकादमीत आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन सकाळी 9.45 वाजता कला अकादमीचे अध्यक्ष व उपसभापती विष्णू वाघ यांच्या हस्ते होईल.
पणजी : कला अकादमी गोवा व उत्कर्ष सेवा मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 7 रोजी मुंबई येथील निमंत्रित 8 संस्थांचा समावेश असलेला ‘एकांकिका महोत्सव’ कला अकादमीत आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन सकाळी 9.45 वाजता कला अकादमीचे अध्यक्ष व उपसभापती विष्णू वाघ यांच्या हस्ते होईल. या वेळी कला अकादमीचे उपाध्यक्ष सुशांत खेडेकर, उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष श्यामराव चौगुले व उत्कर्ष सेवा मंडळाचे इतर पदाधिकारी तसेच अकादमीचे सदस्य सचिव नीळकंठ शिंगणापुरकर हे उपस्थित असतील. उत्कर्ष सेवा मंडळाने ‘उंबरठा 2015’ या शीर्षकाअंतर्गत मुंबई येथे एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यातील 8 विजेत्या एकांकिका गोव्यातील महोत्सवात सादरीकरणासाठी निवडण्यात आल्या आहेत. साधारण 250 कलाकार, तंत्रज्ञ यांचा चमू गोव्यातील महोत्सवासाठी येणार आहे. तांत्रिकदृष्ट्या नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, अभिनय, कुशल दिग्दर्शन व प्रभावी एकांकिका पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना तसेच गोमंतकीयांना मिळणार आहे. उद्घाटन समारंभानंतर सकाळी 10 वा. एकांकिका सादरीकरणास प्रारंभ होईल. यात राकेश जाधव लिखित व दिग्दर्शित व जिराफ थिएटर प्रस्तुत ‘जून-जुलै’, अनिकेत पाटील लिखित व दिग्दर्शित व झिरो बजेट प्रॉडक्शन प्रस्तुत ‘दृष्टी’, मोहन बनसोडे लिखित व ओमकार जयंत दिग्दर्शित फोर्थ वॉल ठाणे प्रस्तुत ‘मित्तर’, स्वरदा बुरसे लिखित व अभिजीत झुंजाररावद्वारा दिग्दर्शित ‘अभिनव’, कल्याण या संस्थेची प्रस्तुती ‘सेल्फी’, राजेश शिरे लिखित व रामचंद्र गावकर दिग्दर्शित विनायक गणेश वझे केळकर कॉलेज मुलुंड प्रस्तुत ‘द क्रो मॅन’, हृषिकेश कोळी लिखित अमोल मोरे व साईनाथ गणुवाड दिग्दर्शित नाट्यमय, ठाणे या संस्थेची प्रस्तुती ‘मुस्काट’, ओमकार राऊत लिखित, स्वप्नील हिंगडे व ओमकार राऊत दिग्दर्शित महर्षी दयानंद महाविद्यालय, परळ या संस्थेची प्रस्तुती ‘बत्ताशी’, व विष्णू सूर्या वाघ लिखित व गिरीश पांडे दिग्दर्शित रंगरेखा मुंबई या संस्थेची प्रस्तुती ‘रक्तपर्जन्य’ या एकांकिकांचा समावेश आहे. एकांकिका महोत्सव सर्वांसाठी खुला असून सर्वांनी या महोत्सवास उपस्थिती लावावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)