नवी दिल्ली - शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबत शिंदे-ठाकरे गटात वाद सुरू आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत हा वाद पोहचला असून दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आयोगाने ३० जानेवारीपर्यंत शिंदे-ठाकरे गटांना लेखी युक्तिवाद सादर करण्याची मुदत दिली होती. आज कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाकडून युक्तिवाद सादर केला. त्यानंतर शिंदे गटानेही आयोगासमोर लेखी युक्तिवाद सादर केला आहे. आता निवडणूक आयोग हे दोन्ही युक्तिवाद तपासून कुठल्याही क्षणी त्यांचा निर्णय घोषित करू शकतात.
या युक्तिवादानंतर शिंदे गटाचे नेते खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, शिवसेनेची जी घटना आहे त्यावर आम्ही मुद्दे सादर केलेत. पक्षाची मान्यता ही त्या राज्यात, देशात किती मतदान होते त्यावर अवलंबून असते. आमदार, खासदार यांच्यावर हे मतदान अवलंबून असते. त्यामुळे लोकप्रतिनिधी ज्यांच्याकडे जास्त त्यांचे मतदान ग्राह्य धरले जाते. त्यावर आम्ही युक्तिवाद मांडला आहे. मुख्य नेता पद हे घटनात्मक आहे ही बाजू निवडणूक आयोगासमोर मांडली आहे. संपूर्ण प्रक्रिया करूनच मुख्य नेता हे घटनात्मक पद निर्माण करण्यात आले. ही बाजू कायदेशीर रित्या आम्ही निवडणूक आयोगासमोर मांडली आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच शिवसेनेच्या घटनेचा उल्लेख वारंवार केला जातोय. पण अरविंद सावंत यांना माहिती नसावं. जेव्हा बाळासाहेबांनी पक्ष निर्माण केला तेव्हा घटना वेगळी होती. जेव्हा उद्धव ठाकरे यांनी पक्षाची धुरा हातात घेतली तेव्हा घटनेत बदल करण्यात आले. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही जो युक्तिवाद मांडलाय तो बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या घटनेप्रमाणे मांडले आहेत. आम्ही बाळासाहेबांच्या घटनेला मानतो. त्यानुसार युक्तिवाद केला आहे असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं.
दरम्यान, एखादी घटना किंवा उठाव एक दिवसात होऊ शकत नाही. त्यानुसार काही वातावरण निर्मिती, प्रसंग उभे राहतात. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात शिवसेना आमदार, खासदार यांच्यावर अन्याय झाला. त्यातून हे निर्माण झाले. धोरण, विचार बदलल्यानंतर हा उठाव झाला आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेनुसार आम्ही धनुष्यबाणावर दावा केला आहे. स्वच्छेने पक्ष सोडलाय असं कुठेही स्पष्ट नाही. बाळासाहेबांनी जी शिवसेना बनवली तेव्हाची घटना आणि उद्धव ठाकरेंनी बनवली तेव्हाची घटना यावरून निवडणूक आयोग निर्णय घेईल. मतदानाची संख्या मोजली जाईल.ज्याच्याकडे मते जास्त त्यांना मान्यता दिली जाईल असा विश्वास खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला.