नवी दिल्ली-
Eknath Shinde Vs. Shiv Sena: एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटापैकी शिवसेना नेमकी कुणाची? आणि बंडखोर आमदारांच्या अपत्रातेच्या याचिकांवर नेमका कोणता निर्णय द्यायचा ते आता पाच न्यायमूर्तींचा समावेश असलेलं घटनापीठ ठरवणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश रमण्णा यांनी याप्रकरणाची तातडीनं सुनावणी घेत हे संपूर्ण प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचं ऐतिहासिक प्रकरण आता घटनापीठाकडे वर्ग करण्यात आल्यामुळे या घटनापीठात नेमकं काय काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
मोठी घडामोड! शिंदे-ठाकरे वाद घटनापीठाकडे वर्ग; गुरुवारी सुनावणी
सरन्यायाधीशांनी आज ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या सर्व याचिका घटनापीठाकडे वर्ग करताना निवडणूक आयोगालाही परवा होणाऱ्या सुनावणीपर्यंत कोणताही निकाल देऊ नका असेही आदेश दिले आहेत. घटनापीठात एकूण पाच न्यायमूर्तींचा समावेश असणार आहे. नेमकं कोणकोणत्या न्यायमूर्तींचा समावेश असेल हे देखील सरन्यायाधीश रमण्णा ठरवणार आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत विविध मुद्द्यांवर वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिका वेगवेगळ्या करुन त्यावर रितसर सुनावणी घटनापीठाकडे होईल.
घटनापीठात नेमकं काय काय होणार?>> घटनापीठाकडे प्रकरण वर्ग झाल्यावर दोन्ही गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिका वेगवेगळ्या करण्यात येतील.>> कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जावी हे देखील सरन्यायाधीश रमण्णा घटनापीठाला सूचित करतील. >>शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्हावर निवडणूक आयोग निर्णय घेईल>> विधानसभा उपाध्यक्षांवर अपात्रतेची याचिका होती, मग ते अपात्रतेचा निर्णय देऊ शकतात का? हे घटनापीठ ठरवेल.>> राज्यपालांची कृती योग्य ठरवली तर एकनाथ शिंदेंवर आपात्रतेची याचिका आहे त्यावर कोण निर्णय घेणार यावरही कोर्ट निकाल देण्याची शक्यता आहे.
कोर्टात आज काय घडलं?सर्वोच्च न्यायालयाने शिंदे- ठाकरे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केले आहे. याबाबत गुरुवारी सुनावणी होणार आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या वेगवेगळ्या याचिका वेगळ्या केल्या जाणार आहेत. एकमेकांत गुंतागुंत वाढल्याने हे घटनापीठ महत्वाचे निर्णय घेईल व निवडणूक आयोगाची देखील जबाबदारी निश्चित करेल.