Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: एकीकडे १६ आमदारांच्या अपात्रेसह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह याबाबत शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला. यामुळे शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांना वापरता येणार नाही. ठाकरे गटासाठी हा प्रचंड मोठा धक्का मानला जात आहे. यातच शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, एका याचिकेद्वारे न्यायालयाला महत्त्वाची विनंती केली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले. महासत्तेच्या मदतीने आमचा पक्ष चोरीला गेला आहे, हे आम्ही लोकांना सांगू, असे ते म्हणाले. यानंतर आता शिंदे गटाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव गटाने आव्हान दिल्यास न्यायालयाने एकतर्फी सुनावणी घेऊन कोणताही आदेश देऊ नये. त्यांची बाजूही ऐकून घ्यावी, अशी विनंती कॅव्हेटद्वारे न्यायालयाला करण्यात आली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. तर, शिंदे गट आणि भाजपने या निर्णयाचे स्वागत केले आहे. तुम्ही ज्यापद्धतीने धनुष्यबाण चोरला आहे ना, त्या चोरांना माझे आव्हान आहे. तुम्ही धनुष्याबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो. होऊ द्या निवडणूक, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले.
दरम्यान, मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांना संबोधित करण्यासाठी उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियांसह बाहेर आले आणि ओपन कारमधून भाषण केले. यावेळी शिवधनुष्य चोरीला गेलेय. निवडणुकीत गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिला. शिवसेना संपवण्याचे काम सुरु आहे. मात्र शिवसेना संपवता येणार नाही. धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो, असे म्हणत आता लढाई सुरु झालीय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"