नवी दिल्ली-
मुंबईत शिंदे गटाकडून शिवसेनेच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नेमणूक करण्यात आल्याची माहिती समोर येताच नवी दिल्लीत शिवसेनेच्या खासदारांच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे १२ खासदार उद्या एकनाथ शिंदे गटाला समर्थन देणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्ली दौऱ्यावर येत आहेत. शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तातडीनं दिल्लीतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली.
उद्धव ठाकरेंच्या बाजूनं असणाऱ्या खासदारांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. शिंदे गटाकडून शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याच्या वृत्तावर संजय राऊत यांचा चांगलाच संताप झालेला पाहायला मिळाला. राऊतांनी कठोर शब्दांत शिंदे गटावर हल्ला केला. "आधी विधानसभेत कॉमेडी एक्स्प्रेस सीझन १ झाला, आता त्याचा दुसरा भाग सुरू आहे, लोक सर्व पाहत आहेत आणि मजा घेत आहेत", असं संजय राऊत म्हणाले.
शिंदेगटानं जाहीर केली नवी कार्यकारिणी?; उद्या दिल्लीतून शिवसेनेला मोठा धक्का देणार असल्याची चर्चा
"बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेतून फुटून वेगळा झालेला एक गट मूळात राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त कसा काय करू शकतो? हे प्रचंड हास्यास्पद आहे. लोक याची मजा घेत आहेत. विधानसभेत कॉमेडी एक्स्प्रेस सीझन-वन आपण पाहिलं. आता यांचं सीझन-२ सुरू झालं आहे", अशा शब्दांत संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली. शिवसेनेचं आता पुढचं पाऊल काय असेल? असं विचारलं असता संजय राऊत यांनी शिवसेनेचं पुढचं पाऊल यांच्या छाताडावर असेल असं आव्हान शिंदे गटाला दिलं आहे.
ज्या ठिकाणी ठाकरे, त्याच ठिकाणी शिवसेना, बाकी गोष्टींना अर्थ नसल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले. राजन विचारे हेच लोकसभेतील शिवसेनेचे प्रतोद असून जर खासदार फुटले तर त्यांना कायदेशीर भाषेत उत्तर देऊ असंही ते म्हणाले.
"शिवसेना हा एक नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे. अनेकांनी फुटून जाणून गट निर्माण केला असेल, त्यांना कोणताही अधिकार राहिला नाही. या सर्वाचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. जर लोकसभेमध्ये असा कोणी प्रयत्न करणार असेल त्यांना कायद्याच्या भाषेत उत्तर दिलं जाईल", असंही राऊत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांवरच टांगती तलवार म्हणूनच धडपड"स्वत: मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेली मुख्यमंत्रीपदाची शपथच बेकायदेशीर आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयात फक्त न्यायच होईल. अपत्रातेची टांगती तलवार आमदारांवर आहे. त्यामुळेच ही धडपड सुरू आहे. तसंच आमदार आणि कार्यकर्त्यांना भ्रमित करण्यासाठी असे निर्णय शिंदे गटाकडून घेतले जात आहेत", असं संजय राऊत म्हणाले.