लोकसभा आणि राज्यसभेच्या स्टँडिंग कमिटींची मोदी सरकार येत्या काही दिवसांत पुर्नरचना करण्याची शक्यता आहे. ज्या स्थायी समित्यांवर काँग्रेस नेते अध्यक्ष आहेत, त्या समित्या काँग्रेसच्या ताब्यातून जाणार आहेत. यापैकी एका महत्वाच्या समितीवर शिंदे गटाच्या खासदाराची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी साठीच्या समितीवर शशी थरुर अध्यक्ष आहेत. त्यांची ही जागा आता एनडीएतील जुना परंतू आता पुन्हा एकत्र आलेला मित्र पक्ष शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव यासाठी पुढे करण्यात आल्याचे शिवसेनेच्या सुत्रांनी सांगितले आहे. आमच्या पक्षाला आयटी कमिटीचे अध्यक्ष पद ऑफर करण्यात आले आहे. आम्ही यासाठी जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे, असे या सुत्राने सांगितले.
प्रतापराव जाधव महाराष्ट्रातील बुलढाण्याचे खासदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात ते इतर खासदारांसोबत शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यांचे नाव जरी पुढे आलेले असले तरी कार्ती चिदंबरम, जॉन ब्रिटास या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून आयटी पॅनलच्या अध्यक्षपदी थरुर यांचा कार्यकाळ वाढवावा, अशी मागणी केली आहे.
दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीतील सत्ताधारी भाजप खासदार आणि थरुर यांच्यात मोठा वाद आहे. आयटी पॅनेलचे सदस्य निशिकांत दुबे यांनी थरूर यांच्या हकालपट्टीची अनेकवेळा मागणी केली आहे. यासाठी त्यांनी थरूर यांच्यावर पक्षप्रणित अजेंड्याखाली काम केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात विशेषाधिकार प्रस्तावही दाखल करण्यात आला होता. २०१९ मध्ये थरुर यांची बिर्ला यांनी नियुक्ती केली होती.