दिल्लीत राहून केंद्रीय लोकसेवा आयोग व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील उमेदवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा दिलासा दिला आहे. दिल्लीत महाराष्ट्र सदनातील काही खोल्या, तसेच शासनाच्या अखत्यारीतील जागेत जवळपास ५०० खोल्यांची स्वतंत्र इमारत दिल्लीत राहून अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी बांधण्याची घोषणा त्यांनी केली आहे. यामुळे यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळणार आहे.
राज्यातील हुशार व होतकरू मुले दिल्लीत राहून अनेक वर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. दिल्लीत राहून अभ्यास करणे या मुलांसाठी, तसेच त्यांच्या पालकांसाठी खर्चिक बाब ठरते. यामुळे अनेक मुले सनदी सेवेचे प्रयत्न अर्धवट सोडून राज्यात परततात व मिळेल ती नोकरी पत्करतात. अशा मुलांना राज्य शासनामार्फत दिल्लीत निवासाची सोय झाल्यास ते अधिक जोमाने अभ्यास करून प्रशासकीय सेवेसाठी प्रयत्न करतील, तसेच अभ्यासादरम्यान आर्थिक बोजा कमी पडल्यामुळे सर्वसामान्य पालकदेखील मुलांना अशा परीक्षांसाठी प्रवृत्त करतील. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा लवकरात लवकर पूर्णत्वाला जावी. - वैभव पाटील, घणसोली