मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा पत्राच्या माध्यमातून परत येण्याचं आवाहन केल्यानंतरही शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे सत्तापेच शिगेला पोहोचला आहे. या संपूर्ण राजकीय पेचात आता राज्यपाल केंद्रस्थानी आले असून त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे. तसंच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आज मुंबईत परतणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. तर दुसरीकडे आसामला पावसाचा तडाखा बसला आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आसाममधील पूरग्रस्तांच्या (Assam Flood) मदतीसाठी 'शिंदे गटाने' पुढाकार घेतला आहे.
एकनाथ शिंदे गटाकडून आसाममधील पूरग्रस्तांना 51 लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय" असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आसाममध्ये पुराचे थैमान पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालं असून लाखो लोकांना पुराचा फटका बसला आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भबानीपूर भागातील पूरग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी बजली येथील चारलपारा नयापारा येथील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. पुरामुळे आसाममधील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लाखो लोकांना पुराच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. याच दरम्यान अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे आसाम सरकार पूरग्रस्तांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. आसाममध्ये पुरामुळे जवळपास 134 लोकांचा मृत्यू झाला आहे. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री पाण्यात उतरले आहेत.
आसामला पुराचा तडाखा! लोकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उतरले पाण्यात; 134 जणांचा मृत्यू
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पुरामुळे 8 जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, राज्यात 21 लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. राज्यातील विविध पूरग्रस्त भागात मदत साहित्य पाठवण्यात येत आहे. नागाव जिल्ह्याचे जिल्हा उपायुक्त निसर्ग हिवरे यांनी सांगितले की, राज्य सरकार बाधित भागात मदत साहित्य पुरवत आहोत. मदतकार्य सुरू आहे. आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मते, राज्यातील 22 जिल्ह्यांमधील 21.52 लाख लोकांना याचा फटका बसला आहे, आदल्या दिवशी 28 जिल्ह्यांमध्ये 22.21 लाख होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुतांश नद्यांची पाणी पातळी कमी होत आहे. मात्र नागावमधील कोपिली, कछारमधील बराक आणि करीमगंजमधील करीमगंज आणि कुशियारा धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत.