दिल्ली/मुंबई - शिवसेनेतील बंडखोरी दिवसेंदिवस वाढत असून स्थानिक पातळीवर ती नगरसेवकांपर्यत पोहोचली आहे. तर, देशपातळीवर आता खासदारांपर्यंत ही बंडखोरी होतानाचे चित्र दिसून येत आहे. ४० आमदारांचे बंड घडवून आणल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आता मोठा धक्का दिला. शिवसेनेचे राज्यातील १८ पैकी १२ खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता असून मुख्यमंत्री शिंदे आज त्यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी राजधानी दिल्लीत उतरताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री शिंदे सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. आज मंगळवारी दिवसभर ते दिल्लीत असणार आहेत, ते शिवसेनेच्या बंडखोर खासदारांची बैठक घेऊन आमचीच मूळ शिवसेना असल्याचा दावा करतील व एनडीएमध्ये त्यांना अधिकृतपणे सामावून घेतले जाईल, असे मानले जाते. आमदारांच्या बंडाबाबतही त्यांनी हीच भूमिका घेतली होती. ठाकरे गटाचे विनायक राऊत हे पक्षाचे लोकसभेतील नेते असून राजन विचारे हे प्रतोद आहेत. त्यांच्या जागी राहुल शेवाळेंची गटनेतेपदी, तर भावना गवळी यांची प्रतोदपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. खासदारांनी वेगळी चूल मांडल्यास ठाकरे गटास कोर्टाचा दरवाजा ठोठवावा लागेल. दरम्यान, दिल्ली दौऱ्यासंदर्भात माहिती देताना एकनाथ शिंदेनी आपले 18 खासदार आहेत, असे म्हटले.
मुख्यमंत्री शिंदेंना दिल्लीत पत्रकारांनी गराडा घातला होता. त्यावेळी, शिवसेनेच्या 14 खासदारांची बैठकीला असलेल्या ऑनलाईन उपस्थितीबाबत प्रश्न केला. त्यावर, शिंदेंनी हसत-हसत उत्तर दिले. माझी कुठल्याही खासदारासोबत भेट झाली नाही. पण, 12 कशाला आपले 18 खासदार आहेत, सगळे खासदार मला भेटतील, असे एकनाथ शिंदेंनी दिल्लीत महाराष्ट्र सदन येथे पोहोचताच म्हटले होते. तसेच, मी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भातील केसबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत दाखल झालो आहे. याबाबत मी वकिलांशी चर्चा केली असून 20 तारखेला होणाऱ्या सुनावणीसंदर्भातही मुख्यमंत्री शिंदेंनी विश्वास व्यक्त केला आहे.
शिंदे यांच्यासोबत जाण्याची शक्यता असलेले खासदार
राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे, राजेंद्र गावित, प्रतापराव जाधव, भावना गवळी, कृपाल तुमाने, संजय मंडलिक, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, सदाशिव लोखंडे.
ठाकरेंसोबतचे खासदार
अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर, विनायक राऊत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय (बंडू) जाधव.
उद्धव ठाकरेंवर विश्वास
खा. संजय राऊत यांच्या सोमवारी दिल्लीतील पत्र परिषदेत पाच लोकसभा सदस्य उपस्थित होते. कीर्तीकर आजारी आहेत. दादरा-नगर-हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे, असे खा. विनायक राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.