गुवाहाटी: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३५ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आठवडाभरापासून राज्यातील राजकीय संघर्ष पराकोटीला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता सर्व बंडखोर आमदारांनी गुवाहाटी सोडले असून, आता ते गोव्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. गोवा मार्गे सर्व बंडखोर आमदार मुंबईत येणार आहे. गोव्याला रवाना होण्यापूर्वी बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचेच सरकार महाराष्ट्रात स्थापन होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
आठवडाभराच्या सत्तानाट्यानंतर वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने मंगळवारी रात्री राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेऊन बहुमत चाचणी घेण्यासंदर्भात पत्र दिले. यानंतर राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला निर्देश देत विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. यानंतर सर्व बंडखोर आमदारांनी गुवाहाटी सोडून गोव्याला येण्याचा निर्णय घेतला.
बिलकूल!! बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचेच सरकार
गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये आम्हा सर्वांना चांगले सहकार्य मिळाले. उद्या (गुरुवारी) आम्ही सर्वजण मुंबईत येणार आहोत. महाविकास आघाडीच्या विश्वासदर्शक ठरावात आम्ही सहभागी होणार आहोत. विश्वासदर्शक ठरावानंतर आमच्या विधिमंडळ गटाची एक बैठक होणार आहे. त्यामध्ये पुढील रणनीति ठरवण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत. आम्ही बंडखोर नाही, तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे घेऊन जात आहोत आणि महाराष्ट्रातही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचेच सरकार स्थानप होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. गुवाहाटी विमानतळावर बंडखोर आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, एकनाथ शिंदे साहेब आप आगे बढो, हम आपके साथ हैं, अशी घोषणाबाजीही केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबतच जाऊन सरकार स्थापन करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसे संकतेही एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. एकंदरीत ज्या पद्धतीने गेल्या आठवडाभरापासून घडामोडी घडत आहेत, त्या पाहता पडद्यामागून भाजपच या बंडखोरांना पाठिंबा देत असल्याची चर्चा सुरू आहे. सुरुवातीला सूरत आणि नंतर गुवाहाटीत बंडखोर आमदार गेले. दोन्हीकडे भाजपचीच सत्ता असून, आता गोव्यातही भाजपचेच सरकार आहे. तसेच गेल्या अनेक महिन्यापासून भाजपही हिंदुत्वाच्याच विचारांवरून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करताना पाहायला मिळत आहे. याशिवाय, शिंदे गटानेही शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार स्थापन करण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे बहुमत चाचणीत महाविकास आघाडी अपयशी ठरल्यास भाजपच्या पाठिंब्यावर किंवा शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार स्थापन होऊ शकते, असे सांगितले जात आहे.