सर्वोच्च न्यायालयामध्ये थोड्याच वेळात एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गटामधील शिवसेना कोणाची? अपात्र आदी याचिकांवर सुनावणी होणार आहे. यावेळी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. शिंदे-ठाकरे सुनावणी काल रात्रीपर्यंत आजच्या वेळापत्रकात लिस्टच नव्हती, असे समोर आले आहे.
शिंदे-ठाकरे गटांच्या वादावर सोमवारी सुनावणी होणार होती. यापूर्वी देखील ती दोनवेळा पुढे ढकलण्यात आली होती. सोमवारची सुनावणी देखील पुढे ढकलण्य़ात आली. ती आज, मंगळवारी होणार असे सांगितले जात होते. परंतू सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर कार रात्री उशिरापर्यंत शिंदे-ठाकरे प्रकरण लिस्टच झाले नव्हते, असे वकिलांनी तसेच शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटले आहे.
सरन्यायाधीश रमणा हे येत्या दोन तीन दिवसांत निवृत्त होणार आहेत. त्यांना महाराष्ट्रातील राजकीय पेच महत्वाचा वाटला असावा. निवृत्तीपूर्वी त्यांना यावर निकाल देणे गरजेचे वाटले असावे म्हणून त्यांनी आज हा विषय पटलावर घेतला, असे वकिलांनी म्हटले आहे. तसेच दुपारी साडेबारा वाजता कोर्ट रुम २ मधील कामकाज संपणार आहे. शिंदे-ठाकरे प्रकरणावर जे न्यायमूर्ती नियुक्त केले आहेत ते कोर्ट रुम २२ मध्ये असणार आहेत. तेथून ते तिकडे येतील आणि सुनावणी घेतील. १ वाजता पुन्हा लंच ब्रेक आणि नंतर पुन्हा दुसरे कामकाज सुरु होणार आहे. यामुळे शिंदे-ठाकरे वादावर फक्त अर्धा तासच मिळणार आहे, असे या वकिलांनी सांगितले.
असे झाले तर आज सुनावणी होणार नाही, तर मोठ्या खंडपीठाकडे खटला वर्ग होईल, असेही हे वकील म्हणाले. मात्र, शिवसेनेचे दिल्लीत पोहोचलेले नेते देसाई यांनी आज आदेश निघण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. त्याचीच आम्ही वाट पाहत आहोत, असेही ते म्हणाले.