नवी दिल्ली - शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेसह इतर घटनात्मक मुद्द्यांवर घटनापीठापुढे सुरू असलेली सुनावणी पुन्हा मंगळवारपासून सुरू होणार आहे. नबाम रेबिया निकालाच्या संदर्भात यावेळी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद होणार आहे.
सत्तासंघर्षाप्रकरणी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाने खटला सात सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करावा, अशी मागणी केली आहे. शुक्रवारी सरन्यायाधीशांनी नबाम रेबिया निकालावर पुनर्विचार करण्यासाठी याचिका सात सदस्यीय घटनापीठाकडे देण्याची आवश्यकता आहे काय? याचा निर्णय करू, असे स्पष्ट केले आहे. घटनापीठाने नबाम रेबियासंदर्भातील याचिकेचा विचार करण्यासाठी २१ फेब्रुवारीपासून सलग तीन दिवस सुनावणी होईल असे स्पष्ट केले.
शिंदेंची शिवसेना सक्रिय, घेतला विधिमंडळ पक्ष कार्यालयाचा ताबा
निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर शिंदे गटाने सोमवारी विधिमंडळातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला असून आता ठाकरे गटाला जेरीस आणण्यासाठी शिंदे गट व्हिपही जारी करणार आहे. पक्षप्रतोद भरत गोगावले यांच्यासह शिंदे गटाचे १५-१६ आमदार एकाच वेळी कार्यालयात शिरले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो भिंतीवरून हटविण्यात आला. त्यानंतर, शिंदे गटाची बैठक पार पडली. त्यानंतर, याबाबतचे पत्रही त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले.
१९८८ साली शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला. त्यानंतर, १९९० साली गजानन कीर्तिकर प्रतोद असताना, शिवसेनेचे हे अधिकृत कार्यालय तयार झाले. शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाल्यानंतर सुरुवातीला हे कार्यालय ठाकरे गटाने ताब्यात ठेवण्यात यश मिळविले होते. मात्र, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता शिंदे गटाने हे कार्यालय ताब्यात घेतले आहे. कार्यालयाचे कामकाज यापुढेही सुरू ठेवणार असल्याचे २०१० सालापासून कार्यालयाचे कामकाज पाहणारे विजय जोशी यांनी सांगितले. कार्यालय ताब्यात घेण्यात गोगावले यांच्यासह शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, चिमणराव पाटील आदी आघाडीवर होते.