नवी दिल्ली/मुंबई - गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणाऱ्या बंडखोर आमदारांनी ठाकरे आपण ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा केला आहे. सुप्रिम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमधून बंडखोर शिंदे गटाने हा दावा केला आहे. आमच्याकडे दोन तृतियांश आमदारांचा पाठिंबा आहे. ३८ आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे हे सरकार अल्पमतात असल्याचा दावा बंडखोर शिंदे गटाने याचिकेत म्हटले आहे.
शिवसेनेकडून बंडखोरांवरील कारवाईसाठी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आलेली तक्रार, अपात्रतेसाठी १६ आमदारांना आलेल्या नोटिसा याविरोधात शिंदे गटाने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर या याचिकेमध्ये शिंदे गटाने आपल्याला शिवसेनेच्या ३८ हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. तसेच आपण सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. शिंदे गटाकडे शिवसेनेच्या ३९ आणि इतर १२ अशा ५१ आमदारांचा पाठिंबा आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्याकडून आपल्याला बोलावले जात आहे, तर दुसरीकडे त्यांच्याकडून धमक्याही दिल्या जात असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. तसेच शिंदे गटाकडून संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेल्या प्रक्षोभक भाषणाची माहिती आणि लिंक्स सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी आता सुप्रिम कोर्ट काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.