- रमाकांत पाटील सुरत : एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह येथील हॉटेल ला मेरिडिअनमध्ये मुक्काम ठोकल्याने महाराष्ट्र सरकार गेल्या २४ तासांपासून व्हेंटिलेटरवर आहे. आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दूत बनून आलेले मिलिंद नार्वेकर आणि आमदार रवींद्र फाटक यांनी चर्चा करूनही शिंदे यांच्या बंडासनावर तोडगा निघू न शकल्याने ‘सु केवाय महाराष्ट्र सरकार पडी जाए’अशीच चर्चा येथे सुरू आहे.
विधान परिषदेची मतमोजणी सुरू असतानाच शिंदे यांनी समर्थक आमदारांसह गुजरातची वाट धरली. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गाड्यांचा ताफा सुरतकडे निघाला. अतिशय नियोजनपूर्वक व सर्व खबरदारी घेत निघाल्याने त्याची कुणालाही कुणकूण लागली नव्हती. रात्री दोनच्या सुमारास हे सर्व आमदार येथे दाखल झाले. तत्पूर्वीच हॉटेल परिसरात प्रचंड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
मंगळवारी सकाळपासूनच येथे मीडियाचा फौजफाटा हॉटेलच्या परिसरात तळ ठोकून आहे. हॉटेलमध्ये आत तसेच हॉटेलच्या प्रवेशद्वाराबाहेरील रस्त्यावर, प्रवेशद्वारावर आणि आत तीन ठिकाणी अशी पाचस्तरीय सुरक्षा व्यवस्था असून तेथे कुणालाही प्रवेश निषिद्ध आहे. एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी आलेल्या मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांच्या वाहनांची हॉटेलच्या प्रवेशद्वाराबाहेर १० मिनिटे तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचे वाहन सोडण्यात आले. प्रवेशद्वारात आल्यावर पुन्हा वाहनाची तपासणी झाली. तेव्हा नार्वेकर-फाटक यांच्या सुरक्षारक्षकांना उतरविण्यात आले व दोघांनाच प्रवेश देण्यात आला.
कोणी खेळी केली?nमहाराष्ट्रातील हा सर्व राजकीय खेळ गुजरातचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी केल्याची चर्चा आहे. सी. आर. पाटील हे स्वत: महाराष्ट्रीय आहेत. त्यांनीच शिवसेनेच्या नाराज गटाला एकत्र करून ही राजकीय खेळी केल्याने ‘ऑपरेशन पाटील’ कधी अपयशी होणार नसल्याची चर्चा आहे.आमदार रुग्णालयातnआमदार नितीन देशमुख यांना मंगळवारी पहाटेच त्रास होऊ लागल्याने त्यांना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयाबाहेर मोठा बंदोबस्त आहे.