अलियालूर (तामिळनाडू) : आधीपासूनच मूत्रपिंडाचा विकार असलेल्या व दोन आठवड्यांपूर्वी केरळहून परत आल्यापासून ताप येऊ लागल्याने येथील शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या नारायणस्वामी या ६० वर्षांच्या मजुराने विलगीकरण कक्षात आत्महत्या केली. नारायणस्वामीची कोरोनासाठी ७ एप्रिल रोजी चाचणी करण्यात आली होती व त्याचा अहवालही ‘निगेटिव्ह’ आला आहे. पण हे त्याला कळविण्यापूर्वीच त्याने हे आततायी पाऊल उचलेले. त्याच्या पश्चात ५५ वर्षांची पत्नी व ३८ वर्षांची मुलगी आहे. त्याच्या मुलाचे चार वर्षांपूर्वीच निधन झाले होते.रेशन वाटपाच्या फोटोग्राफीवर राजस्थानात बंदी
जयपूर : रेशन आणि अन्नपदार्थांच्या पाकिटाचे वाटप करताना फोटोग्राफी करण्यावर राजस्थान सरकारने बंदी आणली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे की, गरिबांना भोजन, रेशन वाटप हे सेवा म्हणून केले गेले पाहिजे. स्पर्धा आणि प्रचाराचे हे माध्यम बनायला नको, तसेच गरिबांना मदत करायला हवी आणि जे सक्षम आहेत, असा लाभ घेऊ नये.
रिलायन्स प्रकल्पातील अपघातात दोन ठारभोपाळ : मध्यप्रदेशच्या सिंगरौनी जिल्ह्यात असलेल्या रिलायन्स औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या राखेची स्लरी थोपवून ठेवण्यासाठी बांधलेल्या बांधाला भगदाड पडून झालेल्या अपघातात किमान दोन जण ठार झाले, तर बेपत्ता झालेल्या अन्य चौघांचा शोध शनिवारी सायंकाळपर्यंत सुरू होता. सिंगरौनीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डी.के. त्रिवेदी यांनी मृतांची नावे अभिषेक (९ वर्षे) व दिनेश कुमार (३५), अशी दिली. बेपत्ता असलेल्यांमध्ये कारखान्यातील एका कामगाराचाही समावेश आहे. बांध फुटल्याने राखेच्या चिखलाचा जोरदार प्रवाह दूरवर वाहत जाऊन हा अपघात झाला.
...तर अमेरिकेलाही विकसनशील देश म्हणा -ट्रम्पवॉशिंग्टन : चीन हा जर विकसनशील देश असेल, तर अमेरिकेलाही विकसनशील देशच म्हणावे लागेल. कारण आम्हालाही अजून बराच विकास करायचा आहे, असा युक्तिवाद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ट्रम्प म्हणाले की, चीनने खासकरून जागतिक व्यापार संघटनेत प्रवेश केल्यापासून गेल्या ३० वर्षांत, अमेरिकेचा गैरफायदा घेत विकासाची घोडदौड केली आहे व अजूनही चीन विकसनशील देश असल्याच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय व्यापारात अवाजवी गैरफायदा घेत आहे. एवढा विकास करूनही चीन विकसनशील देश असेल, तर आमची अमेरिकाही अजूनही विकसनशीलच आहे. मात्र, ट्रम्प म्हणाले की, याचा दोष मी सर्वस्वी चीनला देणार नाही. अमेरिकेने घेऊ दिला म्हणून चीन आतापर्यंत गैरफायदा घेत आले आाहे.