नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यात एका शेतकरी महिलेने थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे. शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर हवं आहे. हेलिकॉप्टर खरेदीसाठी लोन आणि ते चालवण्यासाठी लायसन्स द्या अशी मागणी शेतकरी महिलेने केली आहे. बसंती बाई असं या शेतकरी महिलेचं नाव असून महिलेला हेलिकॉप्टर हे हौस म्हणून नको आहे. काही लोकांनी तिच्या शेताकडे जाणारा रस्ता बळकावला आहे. हा रस्ता खुला करून द्यावा यासाठी महिलेने सरकारी कार्यालयाला अनेक चकरा मारल्या मात्र तिथे कोणीच तिचे ऐकून घेतले नाही. शेवटी तिने थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील मंदासौर जिल्ह्यातील बसंती बाई या शेतकरी महिलेनं हे पत्र राष्ट्रपतींना लिहलं आहे. कारण म्हणजे त्यांचा शेतात जाण्याचा रस्ता काही गावगुंडांनी बंद केला आहे. हा रस्ता सुरू व्हावा म्हणून त्यांनी सरकार दरबारी अनेकदा खेटे घातले. मात्र त्यांच्या मागणीची कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी पत्र लिहिलं आहे. पत्रातून त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. "माझी 0.41 हेक्टर जमीन आहे. त्या छोट्या जमिनीची संसाराचा गाडा हाकण्यासाठी मला मदत होते."
"गेल्या अनेक दिवसांपासून या शेतामध्ये जाण्याचा रस्ता गावातील गुंड परमानंद पाटीदार आणि त्यांचा मुलगा लवकूश पाटीदार यांनी बंद केला आहे. शेतामध्ये जाणारा रस्त्यावर खड्डा खोदला आहे. त्यामुळे शेतामध्ये जाणं अवघड झालं आहे. मी शेती देखील करू शकत नाही. शेतामध्ये जाणारा रस्ता तयार करा या मागणीसाठी मी अनेक कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. तिथे कोणीही माझी तक्रार ऐकली नाही" असं बसंती बाई यांनी म्हटलं आहे.
"कृपया मला हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी कर्ज द्यावं. तसंच ते चालवण्यासाठी लायसन्स उपलब्ध करुन द्यावं. ज्यामुळे मी माझ्या शेतामध्ये जाऊ शकेल" अशी मागणी बसंती यांनी पत्रात केली आहे. जिल्हाधिकारी मनोज पुष्प यांना याबाबत विचारलं असता त्यांनी हे प्रकरण एसडीओ आणि तहसीलदाराकडं सोपवलं असल्याचं सांगितलं आहे. तसेच शेतामध्ये जाणारा एक रस्ता दुसऱ्या बाजूने असून दुसऱ्या रस्त्याचा वाद सुरू आहे, त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.