नवी दिल्ली:दिल्लीविमानतळावर विमानाबाहेर व्हीलचेअरवर एकटीच बसलेल्या वृद्ध महिला प्रवाशाचे नाव आहे शशिकला गोस्वामी. आईला चालता येत नसल्याने त्यांचा मुलगा कर्मचाऱ्यांकडे व्हीलचेअरसाठी विनवणी करत असतानाही या कर्मचाऱ्यांना मायेचा पाझर फुटला नाही. त्यामुळे त्यांना तब्बल ३ तास विमानतळावर एकट्याने बसावे लागले, पार्किन्सन्स, उच्च मधुमेहाने त्रस्त ८४ वर्षीय गोस्वामी अलायन्स एअरवेजच्या विमानाने जयपूरहून दिल्लीला आल्या होत्या, या विमानाचे उड्डाण दीड तास उशिराने झाले होते. रात्री ९:२२ वाजता हे विमान दिल्लीत उतरले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार घडला. आईसाठी मुलगा तीन तास इतरांना विनवण्या करत होता.
हेच का आदरातिथ्य?
आईसाठी मुलाने व्हीलचेअर मागितली असता ती येत असल्याचे सांगण्यात आले. १५ ते २० मिनिटे वाट पाहिली, संपूर्ण विमान रिकामे झाले, एसी बंद करण्यात आला, तरीही मदतीला कोणी आले नाही. त्यानंतर मुलगा सुशीलनेच त्यांना खाली आणले.
तोवर कर्मचारी व विमानतळ बसही निघून गेली होती. लगेजमधील व्हीलचेअर मिळवली. या ३ तासांत आई जवळजवळ बेशुद्ध होती. रक्तातील साखरही प्रचंड कमी झाली होती. आईचा मृत्यूही झाला असता, असे सुशील यांनी सांगितले.
यावेळी पायलट, को-पायलट घेऊन जाणारी एक कार तिथे आली असता खूप विनवणी केल्यानंतर त्यांच्या कारमध्ये आईला विमानतळावर नेण्यात आले. दिल्ली विमानतळावर विमानाबाहेर व्हीलचेअरवर बसलेल्या ८४ वर्षीय शशिकला गोस्वामी. या घटनेबाबत एअरलाइसने माफी मागितली असून, चौकशी सुरू आहे.