ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - क्रिकेट सामने, फुटबॉल सामने, पावसाचा अंदाज याप्रमाणे राजकीय निवडणुकांच्या निकालांवरही मोठया प्रमाणात सट्टा खेळला जातो. प्रत्यक्ष निकालाआधी एक्झिट पोलची अंदाज वर्तवण्याची एक शास्त्रोक्त पद्धत असते तसेच सट्टा बाजाराचेही एक नेटवर्क असते त्यावर सट्टाबाजार अमुक एका पक्षाला पसंती देतो. उद्या जाहीर होणा-या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी सट्टाबाजारामध्ये भाजप फेव्हरेट आहे. सर्वांचे लक्ष लागलेल्या उत्तरप्रदेशमध्ये सट्टा बाजाराने भाजपाला पसंती दिली आहे. पंजाब विधानसभेची अवस्था त्रिशंकू राहील असे सट्टा बाजाराचे मत आहे. सट्टा बाजाराच्या गणितानुसार भाजपाने पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर काँग्रेस-समाजवादी पक्षाला पिछाडीवर टाकले.
पहिल्या टप्प्यामध्ये काँग्रेस-सपा आघाडीवर होते. चुरुच्या सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार भाजपाला 190 ते 193, समाजवादी पक्ष-काँग्रेस आघाडीला 125 ते 128 आणि 65 ते 67 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मुंबईच्या सट्टा बाजाराने भाजपाला 198 ते 201, सपा-काँग्रेस आघाडीला 119 ते 122 आणि बसपाला 62 ते 64 जागा दिल्या आहेत. चुरु आणि मुंबई दोन्ही सट्टा बाजारांनी पंजाबमध्ये आप आणि काँग्रेसला 53 ते 55 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भाजपा-अकाली दलाला फक्त 6 ते 7 जागा मिळतील असे म्हटले आहे.
11 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर चुरु बाजाराने सपा-काँग्रेस आघाडीला 170 ते 180 आणि भाजपाला 140 ते 150 जागा दिल्या होत्या. 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्याच्या मतदानानंतर सट्टाबाजाराने भाजपाला सर्वाधिक जागा दिल्या. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालाने सट्टा बाजारा समोरचे चित्र अधिक स्पष्ट केले. नोटाबंदीचा काहीही परिणाम झालेला नसून लोकांनी भाजपाला मतदान केल्याचे या निकालातून स्पष्ट झाले. हाच ट्रेंड उत्तरप्रदेशातही कायम राहिल असा सट्टेबाजाराचा अंदाज आहे.