ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 11 - 2014च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या अभूतपूर्व यशात रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा मोलाचा वाटा होता. किशोर यांच्यामुळेच 2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपानं घवघवीत यश मिळवलं होतं. मात्र त्यानंतर प्रशांत किशोर आणि अमित शाह यांच्यात वादाच्या घटना समोर आल्या आणि प्रशांत किशोर यांनी कमळाची साथ सोडून दिली. उत्तर प्रदेश निवडणुकीतही काँग्रेसचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकांनंतर काँग्रेसचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या करिअरमध्ये मोठा यू-टर्न येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमधल्या पराभवानंतर काँग्रेस त्यांना दूर ठेवण्याच्या विचारात आहे. याआधी प्रशांत किशोर यांच्या रणनीतीमुळेच काँग्रेसचा आसाम राज्यात पराभव झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रशांत किशोर यांनी व्यापक रणनीती आखली होती. लखनऊमधल्या वॉर रूममध्ये काँग्रेसच्या विजयाची रणनीती ठरवण्यात आली होती. प्रशांत किशोर टीमच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशमधल्या प्रत्येक बुथवर जाऊन विश्लेषण केलं होतं. प्रत्येक बुथनुसार जातीयवाद आणि धार्मिक मतांचा आकडा तयार करण्यात आला आहे. तिकीटवाटपातही या मतांना डोळ्यासमोर ठेवून उमेदवारांना तिकीट देण्यात आलं होतं. प्रशांत किशोर यांची टीम 500 लोकांचं काम करत असल्याचीही चर्चा होती. मात्र आसामसारखी उत्तर प्रदेशातही प्रशांत किशोर यांची रणनीती सपशेल अपयशी ठरली आहे. तसेच काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी करण्यातही प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याप्रमाणेच अखिलेश आणि राहुल यांच्या रॅलीचं प्रत्येक भाषण प्रशांत किशोरच लिहीत होते. प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात मुख्यमंत्री नीतीशकुमार यांच्यासोबत बिहारमध्ये काम केलं होतं. प्रशांत किशोर यांनी नीतीशकुमार यांच्यासोबत बिहारमध्ये व्यापक प्रचार अभियानही राबवलं होतं. तसेच नीतीशकुमार यांच्या विजयात प्रशांत किशोर यांनी मोलाची भूमिका बजावली होती. आता उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टीला विजय मिळवून देण्यात आखलेल्या रणनीतीला अपयश आलं असून, आरएसएसच्या रणनीतीसमोर प्रशांत किशोर घायाळ झाले आहेत. काँग्रेसचं 15 वर्षांनंतरही उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळवण्याचं स्वप्न धुळीस मिळालं आहे.
UP ELECTION 2017 - प्रशांत किशोर यांच्या रणनीतीला अपयश, करिअरवर टांगती तलवार
By admin | Published: March 11, 2017 3:26 PM