ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - निवडणुकांच्या तापलेल्या वातावरणात उत्तर प्रदेशमधील कैराना, अलीगढ आणि मुजफ्फरनगर येथे हिंदू व मुस्लीमांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या भागांमध्ये दौरा केल्यानंतर फर्स्टपोस्टमध्ये आपलं निरीक्षण नोंदवताना ज्येष्ठ पत्रकार टुफेल अहमद यांनी या भागामध्ये फाळणीसारखी स्थिती निर्माण झाल्याचे म्हटले आहे.
काय आहे कैराना, मुजफ्फरनगर आणि अलीगढमधली स्थिती:
- मुजफ्फरनगर आणि शामली परिसरात छोट्या कारणामुळे दोन गटात झालेल्या भांडणानंतर जातीय दंगल उसळली होती. यामध्ये झालेल्या हिंसाचारात 60 च्यावर लोक मृत्युमुखी पडले होते. तर सुमारे 40,000 लोकांना स्थलांतर करावे लागले होते. याप्रकरणी 110 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दंगलग्रस्त भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती.
- पश्चिम उत्तरप्रदेश मधल्या शामली जिल्ह्यातलं कैराना हे एक छोटंसं गांव. मुसलमान लोक बहुसंख्येने असले तरी हिंदूंचीही संख्या कमी नाही. हिंदू मुस्लिम लोक मिळून-मिसळून राहायचे. पण 2013 मध्ये कैरानाच्या लोकसंख्येमध्ये एक खूप मोठं स्थित्यंतर झालं. अर्थात, असं स्थलांतर झाल्याचं भाजपाच्या नेत्यांचं म्हणणं आहे, तर विरोधकांना हे मान्य नाही.
- जर समाजवादी पार्टीचा उमेदवार विजयी झाला तर कैरानामधून आणखी मोठ्या प्रमाणावर हिंदू स्थलांतर करतील असं स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितलं.
- कैरानामध्ये ड्रग्ज, लुटमार, मद्यविक्रि, वेश्याव्यवसाय अशा अनेक अनेक अनैतिक धंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लीम युवक सहभागी असून हिंदू व मुस्लीम अशा दोन्ही समाजाचे लोक त्रस्त असल्याचे अहररूल इस्लामचे युपी प्रमुख मोहम्मद अली यांनी सांगितले आहे.
- कैरानामध्ये तर लष्कर पाचारण करायला हवं असं मत काहींनी व्यक्त केलं आहे.
- खंडणीखोरांचा फटका प्रामुख्यानं हिंदूंना बसलेला असला तरी अनेक मुस्लीम व्यापारीही खंडणीखोरांमुळे त्रस्त आहेत.
- पोलीसांनी काही कारवाई करायचा प्रयत्न केला तर संपूर्ण समाज पोलीस ठाण्याला वेढा घालतो आणि गुन्हेगारीचा प्रश्न हिंदू मुस्लीम समाजातील तेढ असा बनतो असा अनुभव आहे, त्यामुळे पोलीसांचे कामही जिकिरीचे आहे.
- यापूर्वी हिंदू व मुस्लीम येथे साहचर्यानं राहत होते, परंतु आता मुस्लीमांची संख्या प्रचंड वाढल्याने तणाव निर्माण झाल्याचं मत सुधीर चौधरी या पत्रकारानं व्यक्त केलं आहे.
- स्थानिक आमदार नाहिद हुसैन गुन्हेगारांना पाठिसी घालत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
- मुजफ्फरनगरमध्येही अशीच परिस्थिती असून जर पोलीसांना गुन्हेगाराला मुस्लीम वस्तीतून अटक करायची असेल, तर सैनिकांची बटालियन लागते असा अनुभव एका डॉक्टरने व्यक्त केला.
या सगळ्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या या भागामध्ये प्रचंड तणावाचे वातावरण असून हिंदू व मुस्लीमांमध्ये फाळणीसारकी स्थिती निर्माण झाल्याचे मत निरीक्षकांनी व्यक्त केले आहे.