ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 7 - उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षात सुरू झालेली 'यादवी' पुन्हा एकदा उफाळून येणार असे दिसत आहे. पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांची दुसरी पत्नी साधना यादव यांनी पहिल्यांदाच कौटुंबिक कलहावर उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे.
'माझा खूप अपमान झाला आहे. आता मी पाऊल मागे टाकणार नाही, आणि जे काही होईल ते उघडपणे होईल', कौटुंबिक यादवीवर बोलताना साधना यांनी दुसरीकडे इशारादेखील दिला आहे. दरम्यान, अखिलेश यांना पुन्हा मुख्यमंत्री होताना पाहायचं आहे, असेही साधना यांनी म्हटले आहे. मात्र त्यांचे विधान अखिलेश यांच्यासाठी आव्हान ठरू शकतं, असे बोललं जात आहे.
समाजवादी पक्षातील वर्चस्वाच्या लढाईत साधना यादव यांच्या भूमिकेसंदर्भात अनेक अनुमान लावण्यात आले. यावर त्यांनी पहिल्यांदा जाहीर नाराजी व्यक्त करत सांगितले की, 'मी कुटुंबात भांडणं लावून दिली नाहीत. नेताजींचा (मुलायम सिंह यादव) अपमान करायला नको होता. माझाही खूप अपमान झाला. मात्र आता मी मागे हटणार नाही, जे काही होईल ते उघडपणे होईल', असा इशाराी त्यांनी दिला आहे.
पुढे त्या असंही म्हणाल्या की, 'मी अशा कुटुंबात लहानाची मोठी झाली आहे, जिथे माझे वडील सांगायचे,चांगले काम केल्यानंतर दवंडी पेटवू नये, मात्र आता वेळ बदलली आहे. आपण केलेल्या कामाबाबत लोकांना आता सांगावे लागते.'
'पक्ष वर्चस्व' या मुद्यावर कुटुंबीयांमध्ये सुरू झालेल्या 'दंगल'वर बोलताना साधना म्हणाल्या की, 'परिवारात जे काही झाले ते वाईट. माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांप्रकरणी मला कुणालाही काहीही बोलायचे नाही. एका मुख्य सचिवाची बदलीमागे माझा हात होता, असा खोटा आरोप काहींनी केला'.
दरम्यान, शिवपाल यांच्यासोबत जे झाले ते चुकीचे होते. त्यांची काहीही चूक नव्हती. त्यांनी नेताजी आणि पक्षासाठी खूप काही केल्याचंही साधना यांनी सांगितले. तर अखिलेश यादव यांच्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, 1 जानेवारीनंतर माझी अखिलेशसोबत एवढी बोलणी झाली आहेत, की तितक्या प्रमाणात गेल्या पाच वर्षांतही झाली नव्हती. अखिलेश यांना कुणी भरकटवलंय ते माहीत नाही, ते माझा आणि नेताजींचा खूप आदर करतात.
दरम्यान, मुलायम सिंह यादव आणि साधना गुप्ता यांची भेट 1989 साली झाली होती. मुलायम सिंह यांनी पहिली पत्नी मालती देवी यांच्या मृत्यूच्या चार वर्षांनंतर 2007 साली सुप्रीम कोर्टात दिलेल्या एक शपथपत्रात साधना गुप्ता यांनी पत्नी आणि प्रतीक यांनी मुलगा म्हटले होते.