ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - राजकीय दृष्टया अत्यंत महत्वाच्या असलेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला अनुकूल निकाल लागतील असा अंदाज राजकीय विश्लेषक आणि पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे. दोनवर्षांनी होणा-या लोकसभा निवडणुकीचा विचार करता उत्तरप्रदेश जिंकणे भाजपासाठी महत्वाचे असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणूक निकालाकडे लागले आहे.
2014 लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला उत्तरप्रदेशात एकूण 42 टक्के मते मिळाली आणि राज्यातील 80 पैकी तब्बल 73 जागांवर भाजपा खासदार विजयी झाले. त्यावेळी मोदी लाट होती. यंदाच्या विधानसभेत त्या मतांमध्ये 10 टक्क्यांची घट गृहित धरली तरी, भाजपासाठी सहज सत्तेचे दरवाजे उघडले जाऊ शकतात. कारण 2012 मध्ये 29 टक्के मते मिळवून उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष पूर्ण बहुमताने सत्तेत आला. त्यापूर्वी 2007 मध्ये बसपाने 30 टक्के मते मिळवून राज्याची सत्ता मिळवली होती असे राजदीप यांनी म्हटले आहे.
काही विश्लेषक काँग्रेस-समाजवादी पक्षाची आघाडी झाल्यामुळे 2015 बिहार विधानसभेच्या निवडणुकीशी तुलना करत आहेत. त्यावेळी बिहारमध्ये भाजपा विरोधात महागठबंधन झाल्यामुळे भाजपाला दुस-या स्थानावर समाधान मानावे लागले. पण उत्तरप्रदेशात तिरंगी लढत आहे. राज्यातील दोन प्रमुख पक्ष समाजवादी पक्ष आणि बसपा अखिलेश स्वतंत्र लढत आहेत. नितीश कुमार-लालू प्रसाद यादव यांच्याप्रमाणे त्यांच्यात आघाडी झालेली नाही. उत्तरप्रदेशात काँग्रेसकडे कमकुवत पक्ष म्हणून पाहिले जाते असे निरीक्षण राजदीप यांनी नोंदवले आहे.
उत्तरप्रदेशात विरोधक मोदींना 'आऊटसाईडर' ठरवत असले तरी, मोदींबद्दल एक विश्वास आहे. मोदींनी दत्तक घेतलेल्या वाराणासीतील जयापूर गावात रस्त्यांची दुरावस्था आहे. सोलार पॅनलच्या बॅटरींची चोरी झालीय, टॉयलेटमध्ये पाण्याची व्यवस्था नाही तरीही इथले मतदार मोदींना मतदान करणार असे म्हणतात. नोटाबंदीची झळ सोसावी लागले हे इथल्या लोकांना मान्य असले तरी, ते मोदींना साथ देण्याचा त्यांचा सूर आहे असे राजदीप यांचे निरीक्षण आहे.