ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती घेण्यास एक दिवस शिल्लक असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशात काँग्रेस - समाजवादी पक्षाचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. एक्झिट पोलमध्ये उत्तरप्रदेशात भाजपाची सत्ता येईल असा अंदाज वर्तवला जात असल्यावरुन विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राहुल गांधी यांनी एक्झिट पोलवर काही बोलू शकत नाही असं सांगितलं. राहुल गांधी बोलले आहेत की, 'एक्झिट पोलची परिस्थिती बिहारसारखी होईल. आमची युती जिंकत आहे. असे एक्झिट पोल आम्ही बिहारमध्येदेखील पाहिले आहेत. यावर उद्या बोलू'.
पाच राज्यांच्या विधानसभांची मतमोजणी शनिवारी सकाळी होणार असली तरी विविध एक्झिट पोलचे निकाल आले असून, ते खरे निघाल्यास देशात मोदी लाट कायम असल्याचे दिसते. उत्तर प्रदेश व मणिपूरमध्ये भाजपाला संपूर्ण बहुमत मिळेल. पंजाबमध्ये काँग्रेस व ‘आप’मध्ये अटीतटीच्या लढतीची शक्यता एक्झिट पोल्सनी व्यक्त केली आहे. उत्तराखंडात भाजपाला बहुमत मिळेल, असे निष्कर्ष काही एक्झिट पोल्समध्ये आहेत, तर काहींनी तिथे काँग्रेसला कसेबसे बहुमत मिळू शकेल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. मणिपूर व गोव्यातही भाजपाला बहुमत मिळेल, असे एक्झिट पोल सांगतात.
Our alliance is winning, such exit polls we saw in Bihar also. Will talk tomorrow: Rahul Gandhi pic.twitter.com/C1uP6QycN5— ANI UP (@ANINewsUP) March 10, 2017
राहुल गांधी यांनी बिहारचा हवाला देत एक्झिट पोलच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित केला आहेत. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाने एक्झिट पोल पुर्णपणे बोगस असल्याचं सांगितलं आहे. समाजवादी पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी सांगितलं आहे की, 'एक्झिट पोल बदलण्यासाठी काही चॅनेल्सवर दबाव टाकण्यात आला असल्याची माझ्याकडे माहिती आहे'.
एक्झिट पोलमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची पिछेहाट होताना दिसल्यावर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी धर्मनिरपेक्ष एकतेचा पत्ता खोलला आहे. जातीय ताकदींना रोखायचं असेल तर धर्मनिरपेक्ष ताकदींना एकत्र येण्याची गरज असल्याचं अखिलेश यादव बोलले आहेत. मायावतीच्या बहुजन समाज पक्षाकडे त्यांचा सरळ इशारा होता.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर व गोवा या पाच राज्यांपैकी केवळ गोव्यात आता भाजपाचे सरकार होते. तिथे तोच पक्ष पुन्हा सत्तेवर येण्याची चिन्हे एक्झिट पोल व्यक्त करीत आहेत. पंजाबमध्ये अकाली दलाबरोबर भाजपा सत्तेत होती. पण तिथे दोन्ही पक्ष दणकून मार खातील आणि काँग्रेस व आप यांच्यापैकी एकाला बहुमत मिळेल, असे हे पोल सांगतात. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्षाला ११0 ते १६९च्या दरम्यान जागा मिळतील, असे हे पोल म्हणतात. तिथे भाजपाला १५५ ते २१0च्या दरम्यान जागा मिळतील, असे या सर्व्हेवरून दिसते. केवळ एकाच पोलमध्ये तिथे भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त झाली असली तरी अन्य पोलनुसार भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, पण बहुमत मात्र मिळणार नाही, असे दिसते. मणिपूरमध्ये काँग्रेसची सत्ता होती. पण तो पक्ष तिथे मागे पडेल, असे पोल सांगतात. म्हणजेच आसाम, अरुणाचल प्रदेश यानंतर ईशान्येकडील आणखी एका राज्यात भाजपा शिरकाव करेल.
हे पोल जाहीर होत असतानाच अखिलेश यादव यांनी आम्ही उत्तर प्रदेशात कदापि भाजपाचे सरकार बनू देणार नाही, त्यासाठी प्रसंगी मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीशी समझोता करू, असे बीबीसीला सांगितले आहे. याचाच अर्थ सपाला बहुमत मिळणार नाही, हे जणू त्यांनी मान्यच केल्याचे दिसते.