- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
उत्तरप्रदेश विधानसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान उद्या, बुधवारी होत असून, एका महिन्यापेक्षा अधिक काळ गरजणाऱ्या परस्परांविरोधी मुलुखमैदान तोफा थंडावल्यनंतर सर्र्वाचे लक्ष ११ मार्चला जाहीर होणाऱ्या निकालांकडे आहे. दिल्लीत संभाव्य निकालांबरोबरच या सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, याबाबत वेगवेगळे कयास व्यक्त होऊ लागले आहेत. उत्तर प्रदेशात सत्ता कोणाची येईल? समाजवादी व काँग्रेसच्या आघाडीला ही संधी मिळेल की निकालानंतर बसप आणि भाजप परस्परांशी युती करून एकत्रितरित्या सत्तेचा दावा करतील? मतदारांनी एकट्या भाजपच्या हाती सत्ता सोपवली तर त्या पक्षातर्फे कोण मुख्यमंत्री होईल? अशा प्रश्नांच्या चर्चेचे फड राजधानीत रंगू लागले आहेत. मतदानाच्या तीन टप्प्यांनंतर मुंबई, दिल्ली सट्टाबाजारांनी भाजपला ा सर्वाधिक जागा मिळतील, सरकार भाजपचेच असेल असे भाकित व्यक्त केले आहे. राजधानीतील काही राजकीय जाणकारांनीही त्यास दुजोरा दिल्याने मुख्यमंत्री कोण याची चर्चा आपसूकच सुरू झाली.समाजवादी व काँग्रेस आघाडीतर्फे अखिलेश यादव आणि बसपच्या मायावती मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारच आहेत. भाजपने मात्र आपला उमेदवार अखेरपर्यंत घोषित केला नाही. पक्षाच्या नेत्यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले. तथापि भाजपकडे एकहाती सत्ता आल्यास त्याचे श्रेय प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य यांनाच मिळेल आणि तेच सर्वात प्रबळ दावेदार ठरतील. मौर्य भाजपचे जुने निष्ठावान आहेत. पंतप्रधान मोदी व अमित शाह यांचे निकटवर्ती आहेत. रा.स्व.संघाशीही त्यांचा निकटचा संबंध आहे. यंदा निवडणूक प्रचारात भाजपने ओबीसी मतांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले होते. मौर्य ओबीसी आहेत. भाजपकडे उत्तर प्रदेशात पहिल्यांदा सत्ता आली तेव्हाही पक्षाने लोध समाजातील कल्याणसिंगांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली होती.मौर्य यांच्याखेरीज रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, राज्यातले फायरब्रँड नेते योगी आदित्यनाथ, लखनौचे महापौर दिनेश शर्मा यांची नावेही चर्चेत आहेत. ज्येष्ठापेक्षा नवा चेहरा बरा?पंतप्रधानपद मोदींकडे आल्यानंतर महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंडातील मुख्यमंत्रीपद सोपवण्याचा ट्रेन्ड पाहता, जुन्या,ज्येष्ठ नेत्यांऐवजी स्वच्छ प्रतिमेचा नवा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी दिल्याचे चित्र दिसते. विधानसभा निवडणुकांआधी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवले होते. सत्तेची संधी येताच मुख्यमंत्रीपद त्यांच्याच हाती सोपवले. त्याचप्रमाणे उत्तरप्रदेशचे प्रदेशाध्यक्षपद मौर्य यांच्याकडे असल्याने पहिली संधी त्यांनाच मिळेल, असा अंदाज आहे.