नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष सत्ता मिळविण्यासाठी आता जोरदार प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. "जर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यंदा देखील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकले तर ते पंतप्रधान पदाचे दावेदार होतील" असं विधान केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार पुन्हा आले तर काय होईल? असा प्रश्न अखिलेश यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.
"पुन्हा एकदा जर योगींनी निवडणूक जिंकली तर ते पंतप्रधान पदाचे दावेदार होतील. आतापासूनच डबल इंजिनची टक्कर होते आहे, भाजपावाल्यांनी याचा विचार करावा" असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. पंचायत आजतक या कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'UP+YOGI खूप आहे UPYOGI', असे म्हणत योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर पलटवार करत अखिलेश यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 'अनुपयोगी' म्हटलं आहे. तसेच केंद्र आणि राज्याच्या 'डबल इंजिन' विधानावरही निशाणा साधला आहे.
"यंदा जनता भाजपाला राज्यातून हद्दपार करणार"
"पंचायत निवडणुकांच्या वेळीच जनतेने जळपास निर्णय केला होता. मात्र, सरकारी यंत्रणेमुळे बहुतांश जणांना अर्जही भरता आले नाहीत. निवडणुकी दरम्यान महिलांची साडी ओढणे, कपडे फाडणे आदी घटनांच्या छायाचित्रांमुळे महाभारताची आठवणी झाली होती. अशा घटना लोकशाहीत कधीच कोणी पाहिल्या नाहीत. जिल्हा पंचायत निवडणुकीत ज्या प्रकारे बेईमानी झाली त्याची शिक्षा जनता भाजपाला नक्कीच देईल. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने भाजपा सरकार पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे यंदा जनता भाजपाला राज्यातून हद्दपार करणार आहे" असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"मोदी पंतप्रधान पद सोडून राष्ट्रपती होतील तर योगी आदित्यनाथ पंतप्रधान होतील आणि उत्तर प्रदेश..."
भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. टिकैत हे सोमवारी आजतक या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिकैत यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री होतील काय़? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला खोचक पद्धतीने उत्तर दिलं आहे. "त्यांना (योगी) पंतप्रधान बनवा... हरकत नाही. हे पंतप्रधान (नरेंद्र मोदी) कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पद सोडतील आणि राष्ट्रपती बनतील. योगी नवे पंतप्रधान होतील. आपला (उत्तर) प्रदेश रिकामा होईल, येथे इतर कोणी तरी नेतृत्व करेल" असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.